अमेरिकेत टिकटॉकची कठोर भूमिका; 3 लाख 80 हजार व्हिडिओ हटवले

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 August 2020

गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाइटडान्सला इशारा दिला होता. 90 दिवसांच्या आत अमेरिकेतून टिकटॉक काढून घ्या असं त्यांनी म्हटलं होतं.

वॉशिंग्टन - अमेरिकेत चिनी अॅप टिकटॉकने वर्षभरात 3 लाख 80 हजारांहून अधिक व्हिडिओ हटवले आहेत. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याने हे व्हिडिओ हटवण्यात आल्याची माहिती कंपनीकडून गुरुवारी देण्यात आली. याशिवाय कंपनीने 1300 पेक्षा जास्त अकाउंट ज्यावरून हेट स्पीच आणि भडकाऊ पोस्ट करत होते त्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

भारतानंतर अमेरिकासुद्धा टिकटॉकवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. टिकटॉकची मालकी बाइटडान्सकडे असून ही कंपनी चीनमध्ये आहे.  टिकटॉकने एका ब्लॉग पोस्टमधून माहिती दिली आहे. त्यामध्ये वर्णभेदी टीका कऱणाऱ्या पोस्ट विरोधात कारवाई केली असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय संघटीत घटकांकडून भडकाऊ भाषणे, द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट केल्या जात आहेत. त्यावर कारवाई करत अशा प्रकारचा कंटेंट ब्लॉक केला आहे. 

हे वाचा - फुटीरतावादी नेत्याला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार; हुर्रियतने स्वीकारला पण नातेवाइकांनी नाकारला

टिकटॉक हे अॅप तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. हे अॅप डान्स व्हिडिओ आणि व्हायरल चॅलेंजसाठी ओळखले जाते. मात्र या महिन्याच्या सुरुवातीला अॅटी डिफिमेशन लीगने याची समीक्षा केली होती. या प्लॅटफॉर्मवर गौरवर्णीयांचा वर्चस्ववाद आणि यहुदींच्या विरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होता. कंटेंटमुळे टिकटॉक अॅप स्क्रूटनी प्रमाणे काम करत आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाइटडान्सला इशारा दिला होता. 90 दिवसांच्या आत अमेरिकेतून टिकटॉक काढून घ्या असं त्यांनी म्हटलं होतं. टिकटॉकवर डेटा सुरक्षेची शंका व्यक्त करताना माहिती चीनपर्यंत पोहोचवली जाऊ शकते असं म्हणत अमेरिकन अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, यावर कंपनीने कोणत्याही प्रकारची माहिती चीनला दिली नसल्याचं म्हटलं असून चीनने माहिती मागितली तरी दिली जाणार नाही असंही स्पष्ट केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TikTok has removed more than 380,000 videos in the United States