#HowdyModi : दहशतवादाविरोधात निर्णायक लढ्याची वेळ : मोदी

Howdy-Modi
Howdy-Modi

ह्युस्टन (अमेरिका) : भारताने आता विकासाची वाट धरली असून, भारत न्यू इंडियाच्या दिशेने जात आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या व्यासपीठावर भारताची प्रतिमा आणखी उंचवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जगात आता दहशतवादा विरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा लढा देत आहेत. त्यांना पाठिंबा देण्याची ही वेळ आहे, असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. 

अमेरिकेतील ह्युस्टन शहरात आयोजित हाउडी मोदी कार्यक्रमात उपस्थित ५० हजार भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी भारतात सगळं काही ठिक असल्याचा विश्वास दिला. मराठीसह हिंदी, बंगाली, गुजरात, तेलुगू अशा वेगवेगळ्या भाषेत त्यांनी भारतात सगळं काही व्यवस्थित सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या सिनेटचे सदस्य उपस्थित होते. 

त्यांना धडा शिकवायला हवा
पंतप्रधान मोदींनी काश्मीरचा मुद्दा मांडताना पाकिस्तानला नाव न घेता लक्ष्य केले. ते म्हणाले, ‘देशात ७० वर्षांपासून प्रलंबित एक मुद्दा आम्ही नुकताच निकाली काढला आहे. कलम ३७०ने काश्मीर-लडाखच्या नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले होते. या कलमामुळे दहशतवादाला खतपाणी घातले. आता संविधानाने दिलेले अधिकार काश्मीरच्या जनतेला मिळाले आहेत. तेथील महिला आणि अल्पसंख्याकांशी होणारा भेदभाव संपुष्टात आला आहे.

लोकसभेतील दोन्ही सभागृहात त्यावर चर्चा झाली. राज्यसभेत आमच्या पक्षाला बहुमत नसतानाही दोन्ही सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमत देऊन या विषयाला मंजुरी दिली. मुंबई हल्ला आणि अमेरिकेवरील ९/११च्या हल्ल्यांचे सूत्रधार तेथेच मिळतात. त्यांना सगळे जग ओळखते. त्यांना आपला देश सुद्धा सांभाळता येत नाही. भारत घेत असलेल्या निर्णयांमुळे अनेकांच्या पोटा दुखत आहे. त्यांना अशांतता हवी आहे. ते दहशतवादाला खतपाणी घातलात. आता त्याविरोधात निर्णायक लढ्याची वेळ आली आहे.’

विविधतेमुळेच भारत महान
मोदी म्हणाले, ‘भारतात केवळ भाषाही नाही, तर वेशभूषा, खाद्य संस्कृती, प्रार्थनेच्या पद्धती आमच्या देशाला महान करतात. विविधतेत एकता हे आमचे वैशिष्ठय असून, हीच आमची प्रेरणा आणि हीच आमची ओळख. जगात कोठेही गेलो तरी, आम्ही ही विविधतेची ओळख सोबत घेऊन जातो.’ मोदी यांनी भाषणात यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकांची माहिती देताना, भारतीय लोकशाहीची वैशिष्ठ्ये सांगितली.

भारत विकासासाठी आतुरलेला
मोदी म्हणाले, ‘आम्ही धैर्यशील आहोत. पण, विकासासाठी आतुरलेले आहोत. सबका साथ सबका विकास हाच आमचा आजचा मंत्र आहे. संकल्प से सिद्धीला आम्ही महत्त्व देत असून, भारत न्यू इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहोत. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. दुसऱ्या कोणाशी नाही. आम्ही स्वतःला बदलत आहोत. आज भारत पूर्वीपेक्षाही वेगाने पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे. काही बदलत नाही, असा विचार करणाऱ्यांना आम्ही आव्हान देत आहोत. पाच वर्षांत आम्ही कल्पनेच्या पलिकडे कामे केली आहेत.’ 

मोदी काय म्हणाले?

  1. एक व्यक्तीही विकासापासून दूर राहणारे हे आम्हाला मान्य नाही.
  2. भारत भ्रष्टाचाराशी लढत असून, त्यासाठी योग्य पावले उचलत आहे. 
  3. जगात भारतात सगळ्यांत स्वस्त डेटा उपलब्ध आहे.
  4. स्वस्त डेटामुळे भारत डिजिटल इंडियाची ओळख आहे.
  5. इज ऑफ डूइंग बिझनेस बरोबर इज ऑफ लिविंगलाही तेवढेच महत्त्व.
  6. भारतात ग्रामीण भागात शौचालये ९९ टक्क्यांवर गेली आहे.
  7. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे पाच वर्षांत ९७ टक्क्यांवर नेले.
  8. हाउडी मोदी हा कार्यक्रम १३० कोटी भारतीयांचा सन्मान.
  9. हाउडी मोदी कार्यक्रमातून नवी हिस्ट्री आणि नवी केमिस्ट्री पहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com