पत्रकार जगातील सगळ्यांत बेईमान जमात: ट्रम्प

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

माध्यमांनी ट्रम्प यांचे भाषण ऐकण्यासाठी फारसे नागरिक आले नाहीत, असे चित्र उभे केले. हा खोटेपणा आहे. या खोटेपणाची त्यांना किंमत मोजावी लागेल

वॉशिंग्टन - पत्रकार ही जगातील सर्वांत बेईमान जमात असल्याची टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. माध्यमांविरोधात युद्धमान असल्याचे सांगत ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या शपथग्रहण सोहळ्यावेळी नागरिकांची संख्या कमी असल्याचे "खोटे वार्तांकन' करणाऱ्या माध्यमांवर कारवाईचा इशारा दिला. ट्रम्प यांनी या कार्यक्रमावेळी किमान 15 लाख नागरिक उपस्थित असल्याचा दावा केला आहे.

"या सोहळ्यावेळी नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते. मात्र माध्यमांनी नागरिकांची संख्या विरळ असल्याचे वार्तांकन केले. मला यावेळी भाषण करताना लक्षावधी लोक दिसले. मात्र माध्यमांनी ट्रम्प यांचे भाषण ऐकण्यासाठी फारसे नागरिक आले नाहीत, असे चित्र उभे केले. हा खोटेपणा आहे. या खोटेपणाची त्यांना किंमत मोजावी लागेल,'' असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सीआयएच्या मुख्यालयामधील एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प हे बोलत होते.

""अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून माझा पहिला कार्यक्रम हा सीआयएमधील असल्यामागे कारण आहे. मी सध्या माध्यमांबरोबर युद्ध करत असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. पत्रकार ही जगामधील सर्वांत बेईमान जमात आहे. मी अमेरिकेच्या गुप्तचर खात्याच्या विरोधात असल्याचेच जवळजवळ त्यांनी भासविले. मात्र आज मी येथे उपस्थित असल्यामागचे कारण हे याच्या नेमके उलट आहे. आणि याची त्यांनाही जाणीव आहे,'' असे ट्रम्प म्हणाले.

Web Title: Trump calls journalists 'most dishonest human beings'