ट्रम्प-क्‍लिंटन पुन्हा एकदा आमने-सामने

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

ट्रम्प यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप अनेक महिलांनी केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. ‘क्‍लिंटन यांच्यावर फक्त चिखलफेक न करता मूलभूत मुद्द्यांवर ट्रम्प यांना जबाबदारीने आपले मत मांडावे लागणार आहे.

वॉशिंग्टन - आपल्या बेलगाम वक्तव्यांनी वादग्रस्त ठरलेले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना आपली छबी सुधारण्याची अखेरची संधी म्हणून आज अमेरिकेत होत असलेल्या शेवटच्या अध्यक्षीय निवडणूक चर्चेकडे (प्रेसिडेन्शियल डिबेट) पाहिले जात आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार नेवाडातील लास वेगास विद्यापीठात हिलरी क्‍लिंटन आणि ट्रम्प यांच्यात तिसरी आणि अंतिम अध्यक्षीय निवडणूक चर्चा होत आहे. विरोधात गेलेले जनमत आपल्या बाजूने वळविण्याची ट्रम्प यांना ही अखेरची संधी असल्याचे मानले जाते. आपल्या भूमिकेत प्रचंड बदल करून ट्रम्प हे अखेरची मोठी चाल खेळू शकतात, अशीही शक्‍यता वर्तविण्यात येते आहे. 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील प्रथेनुसार प्रतिस्पर्धी उमेदवार तीन वेळा समोरासमोर येत धोरणात्मक पातळीवर वाद-विवाद करतात. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. ट्रम्प यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप अनेक महिलांनी केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. ‘क्‍लिंटन यांच्यावर फक्त चिखलफेक न करता मूलभूत मुद्द्यांवर ट्रम्प यांना जबाबदारीने आपले मत मांडावे लागणार आहे. तसेच, रोजगार निर्मितीबाबत त्यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. क्‍लिंटन यांचे आव्हान परतावून लावण्यासाठी ट्रम्प यांना ही अखेरची संधी आहे,‘‘ असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे धोरणकर्ते चार्ली ब्लॅक यांनी ट्रम्प यांना दिला आहे. 

Web Title: trump - clinton set for the last presidential debate