मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्याचे ट्रम्प यांचे आदेश

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केलेल्या नागरिकांमुळे लोकप्रिय मतचाचणीत विजय मिळाला नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारल्यानंतर लगेचच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

न्यूयॉर्क - निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या एक-एक आश्वासनांची पूर्तता करण्याचे काम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केले असून, त्यांनी मेक्सिको-अमेरिका सीमेवर भिंत उभारण्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. तर, दुसरीकडे मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निटो यांनी या निर्णयाला विरोध करत भिंत उभारण्यासाठी निधी देणार नसल्याचे म्हटले आहे.

व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी गृह मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन दक्षिण सीमेवर भिंत उभारण्याच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली. यानुसार, मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्याचे काम सुरु होणार आहे. स्थलांतरीत संबंधांत दिलेल्या आश्वासनानुसार ट्रम्प यांनी पहिले पाऊल उचलले आहे. या भिंतीमुळे अमेरिकेत होत असलेल्या अवैधरित्या घुसखोरीला आळा बसेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला होता.

अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केलेल्या नागरिकांमुळे लोकप्रिय मतचाचणीत विजय मिळाला नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबादारी स्वीकारल्यानंतर लगेचच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाची असल्याचे ट्रम्प यांनी ट्विट केले होते.

अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरित वा निर्वासितांच्या संख्येवर निर्बंध आणण्यासंदर्भातील "एक्‍झिक्‍युटिव्ह ऑर्डर'वर ट्रम्प हे लवकरच स्वाक्षरी करणार असल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. इराक, इराण, सुदान, सोमालिया, सीरिया, लीबिया आणि येमेन या देशांमधून अमेरिकेमध्ये येणाऱ्या निर्वासित व व्हिसा धारकांच्या संख्येवर नियंत्रण आणणे हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे.

Web Title: Trump orders wall to be built on Mexico border