ट्रम्प यांनी रशियाला दिली संवेदनशील माहिती

पीटीआय
बुधवार, 17 मे 2017

डोनाल्ड ट्रम्प व सर्गेई लावरोव यांच्यात अशा कोणत्याही विषयावर चर्चा किंवा माहितीचे आदान-प्रदान झालेले नाही की, जेणेकरून अमेरिकेला धोका उत्पन्न होईल. मी स्वतः त्या वेळी उपस्थित होते. हे वृत्त साफ खोटे आहे.
- मॅकमास्टर, अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांना एका भेटीदरम्यान संवेदनशील माहिती दिल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने दिले आहे.

सर्गेई लावरोव गेल्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीत ट्रम्प यांनी दहशतवादी संघटना इसिससंबंधी गोपनिय माहितीचा खुलासा केल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. जी माहिती अमेरिका मित्र देशांनाही देत नाही. ती ट्रम्प यांनी रशियाला दिल्याचा आरोप यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला आहे.

माहितीविषयी ज्ञात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने हे वृत्त दिले असून, ही माहिती कोडवर्ड स्वरुपात होती. आणि अतिशय महत्त्वाच्या माहितीलाच गुप्तचर संस्थेकडून अशा प्रकारचे कोडवर्ड दिले जातात. त्या माहितीपर्यंत पोचणे इतर अधिकाऱ्यांनी अशक्‍यप्राय असते, असेही वृत्तात म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे सचिव रेक्‍स टिलरसन यांनी या आरोपाचे खंडन केले. या बैठकीत दहशतवादाच्या संभाव्य धोक्‍यांविषयी चर्चा झाली. त्यात लष्कराचे माहितीचे स्त्रोत, दहशतवादविरोधी संभाव्य कारवाई अशा अत्यंत गोपनीय माहितीचा समावेश नव्हता, असे टिलरसन यांनी स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प व सर्गेई लावरोव यांच्यात अशा कोणत्याही विषयावर चर्चा किंवा माहितीचे आदान-प्रदान झालेले नाही की, जेणेकरून अमेरिकेला धोका उत्पन्न होईल. मी स्वतः त्या वेळी उपस्थित होते. हे वृत्त साफ खोटे आहे.
- मॅकमास्टर, अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार

Web Title: Trump shared sensitive information with Russia