डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष!!

वृत्तसंस्था
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

ओहिओ, नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडा या राजकीय दृष्टया अत्यंत संवेदनशील राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षास मिळालेल्या नेत्रदीपक विजयांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे नेतृत्व ट्रम्प यांच्याकडेच येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. ट्रम्प यांचा हा विजय हिलरी समर्थकांसाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे

न्यूयॉर्क - अमेरिकेच्या बहुचर्चित अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्‍लिंटन यांचा पराभव करुन ऐतिहासिक व धक्कादायक विजयाची नोंद केल्याचे आज (बुधवार) स्पष्ट झाले.

ओहिओ, नॉर्थ कॅरोलिना आणि फ्लोरिडा या राजकीय दृष्टया अत्यंत संवेदनशील राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षास मिळालेल्या नेत्रदीपक विजयांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे नेतृत्व ट्रम्प यांच्याकडेच येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. ट्रम्प यांचा हा विजय हिलरी समर्थकांसाठी अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. ट्रम्प यांचा शपथविधी 20 जानेवारी, 2017 रोजी होणार आहे.

मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर हिलरी याच "फेव्हरिट' मानल्या जात होत्या. मात्र मतमोजणी पुढेपुढे सरकु लागल्यानंतर ट्रम्प यांच्याकडे विजय झुकू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. ट्रम्प हे आता अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष होणार आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेतील "इलेक्‍टोरल कॉलेज'व्यवस्थेनुसार 27 राज्यांमधील 276 मते जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केले. ट्रम्प यांच्या तुलनेमध्ये हिलरी यांना केवळ 218 मतेच मिळविण्यात आल्याने डेमोक्रॅट समर्थकांचा मोठाच अपेक्षाभंग झाला.

अद्यापी अन्य काही राज्यांमधील निकाल येणे बाकी असले; तरी आता ट्रम्प यांचा विजय झाल्याचे निश्‍चित झाले आहे.

ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या हिलरी यांच्या तुलनेत ट्रम्प यांनी याआधी कधीच सरकारी पद सांभाळलेले नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष असलेल्या बिल क्‍लिंटन यांची पत्नी असलेल्या हिलरी या त्यानंतरचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीदेखील होत्या.
या निवडणुकीसाठी ट्रम्प यांनी राबविलेली प्रचार मोहिम अत्यंत वादग्रस्त ठरली. "मुस्लिमांना अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यावर बंदी घालण्यासंदर्भात केलेले विधान असो, वा मेक्‍सिकन स्थलांतरित हे गुन्हेगार, बलात्कारी व अंमली पदार्थ व्यावसायिक असल्याची टीका असो'; ट्रम्प यांची विविध विषयांसंदर्भातील भूमिका वादग्रस्त ठरली व त्यांना त्यासंदर्भात विखारी टीकेचा सामनाही करावा लागला.

याशिवाय, ट्रम्प हे महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात वादग्रस्त टिप्पणी करतानाचे 2005 मधील एक चित्रीकरणही उघडकीस आल्यामुळे त्यांच्या प्रचारमोहिमेस मोठाच फटका बसल्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र यानंतरही ट्रम्प यांचा विजयवारु बेफाम दौडल्याचे स्पष्ट झाले आहे!

Web Title: Trump stumps Hillary to become US President!