'ट्रॅव्हल बॅन' आदेशाला हवाई कोर्टाची स्थगिती 

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

अमेरिका जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश डेरिक के वॉटसन यांनी मंगळवारी दिलेल्या आदेशात म्हटले, की नव्या ट्रॅव्हल बॅनच्या आदेशात मागील आदेशाप्रमाणेच काही त्रुटी आहेत. निश्‍चित केलेल्या सहा देशांतून येणाऱ्या लाखो नागरिकांमुळे अमेरिकेच्या हिताला बाधा कशी निर्माण होईल, हे आदेशात स्पष्ट केले नाही.

वॉशिंग्टन : काही मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेला येण्यापासून रोखणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना आज धक्का बसला. हवाई येथील जिल्हा न्यायालयाने ट्रॅव्हल बॅनच्या नवीन आदेशावर तात्पुरती स्थगिती आणली आहे. यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या "ट्रॅव्हल बॅन'संबंधी नवीन आदेश लागू करण्याच्या प्रक्रियेत कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे हा आदेश लागू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर न्यायालयाने स्थगिती दिली. 

अमेरिका जिल्हा न्यायालयाचे न्यायधीश डेरिक के वॉटसन यांनी मंगळवारी दिलेल्या आदेशात म्हटले, की नव्या ट्रॅव्हल बॅनच्या आदेशात मागील आदेशाप्रमाणेच काही त्रुटी आहेत. निश्‍चित केलेल्या सहा देशांतून येणाऱ्या लाखो नागरिकांमुळे अमेरिकेच्या हिताला बाधा कशी निर्माण होईल, हे आदेशात स्पष्ट केले नाही. या आदेशामुळे ट्रम्प प्रशासनाच्या नव्या आदेशावरील कार्यवाहीस धक्का बसला आहे. यावर व्हाइट हाउसने प्रतिक्रिया देताना प्रवक्ता साराह सॅंडर्स यांनी ही स्थगिती धोकादायक आणि दोषपूर्ण असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या अध्यक्षाचे प्रयत्न कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले. न्याय विभाग या स्थगिती आदेशाविरुद्ध याचिका दाखल करेल, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात इराण, लीबिया, सीरिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यास मनाई करणारा आदेश काढला होता. मात्र त्यात दुरुस्ती करून या यादीतून सुदानला वगळण्यात आले आणि चाड आणि उत्तर कोरियाचा समावेश केला. तसेच व्हेनेझुएलाच्या सरकारी अधिकाऱ्यांना अमेरिकेत येण्यास मनाई करणारा हुकूम बजावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump travel ban faces second setback as judge in Maryland blocks restrictions