घ्या! शासकाने उभारला कुत्र्याचा सोन्याचा पुतळा; तिकडे जनता सोसतेय भुकेच्या कळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

वास्तविकत: या देशातील जनता गरिब आहे. अनेक लोकांचे खाण्याचे वांदे आहेत.

तुर्कमेनिस्तान : मानवी समाजाला मुर्त्या आणि पुतळे उभा करुन आपल्या मागे आपली अथवा आपल्या प्रिय व्यक्तींची प्रतिमा जपून ठेवायची आवड आहे. याला कोणत्याच देशातील कोणताही मानवी समाज अपवाद नाहीये. जगाच्या कानाकोपऱ्यात याप्रकारचे अनेक पुतळे दिसून येतील. उंचच-उंच पुतळे उभे करुन एकप्रकारे आपल्या प्रेमाचेही प्रदर्शन व्यक्त केले जाते. असाच एक पुतळा सध्या अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. हा पुतळा कुणा महामानवाचा नाहीये तर एका कुत्र्याच्या आहे. ऐकून आपल्याला धक्का बसला असेल पण हे वास्तव आहे. ही घटना आहे तुर्कमेनिस्तानमधील. तिथे एका शासकाने आपला आवडत्या कुत्र्याची जवळपास 50 फूट उंच अशी मुर्ती बनवली आहे.

हेही वाचा - निवडणुकीत मतांची चोरी वा घोटाळा नाही; US निवडणूक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

2007 पासून देशाची सत्ता सांभाळणाऱ्या गुरबांगुली बेर्दयमुखमेदोव यांनी गेल्या बुधवारी अलबी प्रजातीच्या या कुत्र्याची एक भलीमोठी मुर्ती भरचौकात उभी केली आहे. त्याचं अनावरण शाही पद्धतीने करण्यात आलं आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ही मुर्ती कांस्यापासून बनवली गेलीय. त्यामुळेच ऊन, वारा, पाऊस या सर्वांपासून हा सुरक्षित राहिलं असं सांगितलं जात आहे. तर यावर 24 कॅरेट सोन्याचा मुलामा चढवला गेलाय. निव्वळ कुत्र्याची मुर्ती ही 20 फुटाची आहे. देशातील अश्गाबात नावाच्या भागात या कुत्र्याची ही मुर्ती उभी केली गेली आहे. अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्थादेखील इथेच केली गेली आहे. या जागेवर हर प्रकारची सुख-सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. 

हेही वाचा - माझ्या तुरुंगातील कोठडीत-बाथरुममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते- नवाझ शरिफांची मुलगी

वास्तविकत: या देशातील जनता गरिब आहे. अनेक लोकांचे खाण्याचे वांदे आहेत. जिथे एकीकडे इथले सत्ताधारी सोन्याची मुर्ती उभी करत आहेत तर दुसरीकडे इथली जनता अठराविश्वेदारिद्र्यात आहे. या देशाची अर्थव्यवस्था तेल आणि नैसर्गिक गॅसमुळे तेजीत आहे. मात्र त्याचा फायदा फक्त उद्योगपतींनाच होतो आहे. 2015 साली या सत्ताधीशाने आपलीच सोन्याची मुर्ती बनवली होती आणि जनतेसमोर आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: turkmenistan erects giant gilded dog monument