डोनाल्ड ट्रम्प यांचा 'यू-टर्न'

पीटीआय
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

हवामान बदल, हिलरींना तुरुंगात टाकण्याबाबत भूमिका बदलली

वॉशिंग्टन - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये जी मोठमोठी आश्वासने दिली होती, त्यातील प्रमुख आश्वासनांवर ट्रम्प यांनी आत्ताच "यू-टर्न' घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हवामान बदल, कैद्यांसाठी छळ छावण्या आणि हिलरी क्‍लिंटन यांना तुरुंगात टाकण्याबाबत आपण टोकाची भूमिका घेणार नसल्याचे संकेत ट्रम्प यांनी "द न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राचे पत्रकार आणि संपादकांना दिलेल्या मुलाखतीत दिले आहेत.

प्रशासन आणि माध्यमांशी असलेल्या संबंधांमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या मध्यस्थीला आपण परवानगी देणार असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. तसेच, अध्यक्षपदावर आल्यानंतर स्वतःच्या व्यवसायापासून दूर राहण्याच्या प्रथेलाही आपण थारा देणार नाही, असे ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

'मी सत्तेवर आलो तर हिलरी क्‍लिंटन यांना तुरुंगात टाकण्यात येईल आणि त्यांच्या चौकशीसाठी आयोग नेमण्यात येईल,'' असे ट्रम्प यांनी प्रचारात वारंवार सांगितले होते. मात्र, या मुद्द्यावरही ट्रम्प यांनी माघार घेतल्याचे दिसते. 'क्‍लिंटन परिवाराला त्रास देण्याचा माझा खरोखरच कुठलाही विचार नाही. हिलरींना वेगवेगळ्या माध्यमातून आतापर्यंत प्रचंड त्रास झाला आहे. हिलरींनी बरेच काही भोगले आहे, त्यामुळे त्यांना मी अधिक त्रास देऊ इच्छित नाही,'' असे मत ट्रम्प म्हणाले. हवामान बदलांबाबतही ट्रम्प यांच्या भूमिकेत बदल झाल्याचे त्यांच्या वक्तव्यांवरून दिसून येते. 'हवामान बदलांबाबतच्या मुद्यावर मी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. याप्रकरणी सर्व मार्ग खुले ठेवावेत, अशी माझी भूमिका आहे. स्वच्छ हवा आणि पाणी, या अत्यावश्‍यक बाबी असून, त्याला माझे प्राधान्य असणार आहे,'' असे ट्रम्प म्हणाले. हवामान बदल ही अफवा असून, त्याबाबतचे करार धुडकावून लावण्याचा विचार ट्रम्प यांनी या आधी अनेकदा बोलून दाखवला होता. त्यांच्या प्रचार मोहिमेत तसे आश्वासनही त्यांनी अनेकदा दिले होते. मात्र, आता आपली पहिली भूमिका मान्य करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

कैद्यांचा छळ करण्याचा आपला आता विचार नाही. जनरल (निवृत्त) जेम्स मॅटिस यांना भेटल्यानंतर कैद्यांच्या छळाचा विचार मी सोडून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. मॅटिस यांना ट्रम्प प्रशासनात संरक्षण मंत्रिपद मिळण्याची शक्‍यता आहे.

एकूणच ट्रम्प सरकारने सत्तेवर येण्यापूर्वीच यू-टर्न घेण्याचा धडाका लावला असल्याचे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.

Web Title: u-turn by donald trump