युद्धविरामाचा अंदाज नाही; झेलेन्स्की; मदतीबद्दल देशांचे मानले आभार

रशियावरील कडक निर्बंध लादणाऱ्या आणि युक्रेनला मजबूत लष्करी आणि आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या सर्व देशांचे त्यांनी आभार मानले.
युद्धविरामाचा अंदाज नाही; झेलेन्स्की; मदतीबद्दल देशांचे मानले आभार

किव्ह : युक्रेनमधून रशिया हाकलून देण्यासाठी येथील नागरिक सर्व प्रकारे प्रयत्न करीत आहेत. पण हे युद्ध अजून किती काळ सुरू राहिल याचा अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. दुर्दैवाने हे केवळ ज्यांनी सर्वस्व पणाला लावले आहे, अशा आमच्या जनतेवरच अवलंबून नाही तर आमचे सहकारी, युरोपीय देश आणि संपूर्ण मुक्त जगावर ते अवलंबून आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले आहे.

झेलेन्स्की यांनी शुक्रवारी (ता. १३) रात्री व्हिडिओच्या माध्यमातून भाषण केले. रशियावरील कडक निर्बंध लादणाऱ्या आणि युक्रेनला मजबूत लष्करी आणि आर्थिक पाठबळ पुरविणाऱ्या सर्व देशांचे त्यांनी आभार मानले. रशियाच्या आक्रमणाला तोंड देताना स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी हाच एकमेव आधार आहे. पाश्‍चिमात्य देशांसाठी हा फक्त खर्च नाही, केवळ हिशेब नाही तर भविष्यासाठी आहे, असे झेलेन्स्की म्हणाले. युक्रेनने आज रशियाचे २०० वे लढाऊ विमान पाडले. तसेच त्यांचे रणगाडे, चिलखती वाहने, हेलिकॉप्टर आणि ड्रोनचे मोठे नुकसान झाले आहे, असा दावाही त्यांनी केला.

संरक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा

अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन आणि रशियाचे संरक्षण मंत्री सर्गी शोयगू यांच्यामध्ये काल दूरध्वनीवर चर्चा झाली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेने प्रथमच अशी उच्च पातळीवरील चर्चेसाठी पुढाकार घेतला. युद्ध समाप्तीसाठी कोणताही ठोस निर्णय यामध्ये होऊ शकला नाही.

पेंटॉगॉनचे माध्यम सचिव जॉन किरबे म्हणाले, की युक्रेनमध्ये त्वरित शस्त्रबंदी करावी, असे आवाहन ऑस्टिन यांनी केले असून संवाद कायम सुरू ठेवणे महत्त्वाचे असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ऑस्टिन आणि ‘जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ’चे अध्यक्ष जनरल मार्क मिली यांच्याबरोबर चर्चा करण्यास रशियाच्या नेत्यांची तयारी नसल्याची तक्रार पेटॉगॉनचे अधिकारी वारंवार करीत होते. रशिया- युक्रेन युद्धाला १८ फेब्रुवारीला सुरुवात झाली तेव्हापासून दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी काल प्रथमच संवाद साधला.

झेलेन्‍स्की म्हणाले...

  • मारिउपोल पोलाद प्रकल्पात अडकलेल्या जखमी सैनिकांच्या सुटकेसाठी युक्रेन आव्हानात्मक वाटाघाटी करीत आहे.

  • वाटाघाटींसाठी जगभरातील सर्वात प्रभावशाली मध्यस्थांना आधीच बोलाविले आहे.

  • रशियाच्या फौजांकडून युक्रेनने अनेक शहरे व गावे परत मिळविली आहेत.

  • अशा गावांमध्ये वीज, पाणी, दूरध्वनी सेवा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

  • रशियाच्या गोळीबारात दोनत्सक भागातील एका नागरिकाचा बळी तर १२ जखमी

युद्धाची धग

  • युक्रेनमधील ६० लाख निर्वासीत इतर देशांमध्ये

  • रशियाच्या सैनिकांची पहिल्या युद्धगुन्ह्याची सुनावणी सुरू

  • अन्न टंचाईवर उपाय शोधण्यासाठी भूमध्य देशांच्या प्रतिनिधींसह इटली बैठक घेणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com