युक्रेन युद्ध : सरचिटणीस गुटेरेस यांचे जगाला आवाहन संवेदनाहिन, क्रूर युद्ध थांबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine war  António Guterres Appeal to world stop senseless brutal war
युक्रेन युद्ध : सरचिटणीस गुटेरेस यांचे जगाला आवाहन संवेदनाहिन, क्रूर युद्ध थांबवा

युक्रेन युद्ध : सरचिटणीस गुटेरेस यांचे जगाला आवाहन संवेदनाहिन, क्रूर युद्ध थांबवा

न्यूयॉर्क : युक्रेनमधील युद्ध संवेदनाहिन, क्रूर आणि अंतहिन होत चालले आहे. हे युद्ध थांबविण्यासाठी सर्व जगाने एकत्र यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी आज केले. या युद्धामध्ये संपूर्ण जगाची हानी करण्याची क्षमता आहे, असा इशाराही त्यांनी दिला. युक्रेनमधील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सुरक्षा परिषदेची आज बैठक झाली. यात गुटेरेस यांनी युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ‘युक्रेनमध्ये एक दिवस जरी शस्त्रसंधी लागू केली तरी अनेक जणांचे प्राण वाचतील आणि हजारो जणांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेता येईल.

युक्रेन आणि रशियातीलच नव्हे, तर जगभरातील सर्व नागरिकांच्या भल्यासाठी हे युद्ध थांबायलाच हवे. युक्रेनमध्ये अन्नाचा आणि मदत साहित्याचा पुरवठा सुरुच ठेवायला हवा. अन्न पुरवठा साखळी सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी युक्रेनमधील अन्नधान्य उत्पादन पूर्ववत होणे आवश्‍यक आहे. हे युद्ध संवेदनाहिन आणि क्रूर असून ते अंतहिन होत चालले आहे. ते थांबविणे आवश्‍यक असून त्यासाठी सर्व जगाने एकत्र यावे.’ युक्रेनच्या पूर्व भागात रशियाकडून हल्ले सुरुच आहेत. काही ठिकाणी प्रतिकार होत आहे. दरम्यान, युक्रेनच्या प्रतिहल्ल्यात रशियाची मॉस्कोव्हा हे युद्धजहाज बुडाले होते. या जहाजाच्या समुद्रातील ठिकाणाबाबत युक्रेनला अमेरिकेकडून अचूक माहिती मिळाली होती, असा दावा अमेरिकेने केला आहे.

औषधांची कमतरता

रशियाच्या ताब्यात आलेल्या युक्रेनच्या भागांमध्ये औषधांची आणि वैद्यकीय सुविधेची प्रचंड कमतरता असून नागरिकांचे हाल होत आहेत, अशी टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी आज केली. कर्करोगासारखे गंभीर आजार झालेल्या रुग्णांनाही त्यांना आवश्‍यक असलेली औषधे मिळत नाहीत, असे झेलेन्स्की यांनी सांगितले.

‘शस्त्र ठेवा, सुरक्षित बाहेर पडा’

रशियाने ताबा घेतलेल्या मारिउपोल शहरातून टप्प्याटप्प्यांमध्ये नागरिकांना बाहेर काढले जात आहेत. युक्रेनी सैनिक मात्र अद्यापही शहरातच आहेत. या सैनिकांनाही बाहेर जाण्यास रशिया परवानगी देणार की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मात्र, ‘शस्त्र ठेवा, शरण या आणि मगच सुरक्षित बाहेर सोडू,’ असा इशारा दिला आहे. युक्रेनी सैनिकांनी शरण येण्यास नकार दिला आहे. दरम्यान, या शहरातून युक्रेनचे बरेचसे सैन्य बाहेर पडले असून ते उत्तर दिशेला रवाना झाले असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.

Web Title: Ukraine War António Guterres Appeal To World Stop Senseless Brutal War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top