संयुक्त राष्ट्रसंघामध्येही यंदा प्रथमच दिवाळी साजरी

वृत्तसंस्था
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीवर लावलेली "हॅप्पी दिवाली' हे शब्द आणि पारंपरिक दिव्याची प्रतिकृती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. याबाबत भारताचे राष्ट्रसंघातील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. आमसभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांच्या पुढाकारातून राष्ट्रसंघात हा आनंदोवत्सव साजरा होत असल्याबद्दल अकबरुद्दीन यांनी थॉमसन यांचे आभार मानले आहेत

न्यूयॉर्क - दिवाळीनिमित्त भारतभर सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, अनेक देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांमुळे जगभरातही हा सण साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघामध्येही यंदा प्रथमच दिवाळी साजरी करण्यात आली असून, त्यानिमित्त येथील मुख्यालयावर रोषणाई करण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इमारतीवर लावलेली "हॅप्पी दिवाली' हे शब्द आणि पारंपरिक दिव्याची प्रतिकृती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. याबाबत भारताचे राष्ट्रसंघातील राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. आमसभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांच्या पुढाकारातून राष्ट्रसंघात हा आनंदोवत्सव साजरा होत असल्याबद्दल अकबरुद्दीन यांनी थॉमसन यांचे आभार मानले आहेत. राष्ट्रसंघाची इमारत प्रथमच दिवाळीनिमित्त रोषणाईने चकमत असल्याने अनेक नागरिक आवर्जून छायाचित्रे काढत असल्याचेही अकबरुद्दीन यांनी सांगितले. थॉमसन यांनीही इमारतीचे छायाचित्र ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. "अंधकारावर प्रकाशाने, निराशेवर आशेने, अज्ञानावर ज्ञानाने आणि दुष्टशक्तीवर चांगुलपणाने मात करा. शुभ दीपावली,' असे थॉमसन यांनी ट्विट केले आहे. ही इमारत 29, 30 आणि 31 ऑक्‍टोबर असे तीन दिवस उजळून निघत आहे.

राष्ट्रसंघातही दिवाळीची सुटी
संयुक्त राष्ट्रसंघाने डिसेंबर 2014 मध्ये दिवाळीचे महत्त्व ठळक करणारा ठराव संमत केला होता. हा सण जगातील अनेक देशांमध्ये साजरा केला जात असल्याने दिवाळीच्या दिवसांमध्ये कोणतीही बैठक आयोजित केली जाऊ नये, असे ठरावात म्हटले होते. या वर्षापासून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये दिवाळीची सुटीचा पर्याय कर्मचाऱ्यांसमोर खुला असणार आहे, असेही अकबरुद्दीन यांनी सांगितले. याच वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तही राष्ट्रसंघाच्या इमारतीवर रोषणाई करण्यात आली होती.

Web Title: UN also celebrates diwali