esakal | POK वरचा ताबा सोडा; इमरान खान यांना भारताच्या प्रतिनिधीने सुनावलं
sakal

बोलून बातमी शोधा

india un replay to pak imran khan

पाकचे पंतप्रधान इमरान खान यांच्या भाषणावेळीच वॉकआऊट करणाऱ्या भारताच्या प्रतिनिधींनी युएन महासभेत उत्तराच्या अधिकारात बोलताना  म्हटलं की, सभागृहाने अशा व्यक्तीला ऐकलं ज्याच्याकडे स्वत:चं असं सांगण्यासाठी काहीच नाही.

POK वरचा ताबा सोडा; इमरान खान यांना भारताच्या प्रतिनिधीने सुनावलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघात 75 व्या महासभेत पाकचे पंतप्रधान इमरान खान यांच्याकडून पुन्हा एकदा भारताविरोधात आणि काश्मीरबाबत वक्तव्ये करण्यात आली. पाकच्या खोटारडेपणावर भारताकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं. भारतानं युएनच्या महासभेत उत्तर देताना म्हटलं की, जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. आता फक्त पाकव्याप्त काश्मीर बाकी आहे. तोसुद्धा रिकामा करावा.

संयुक्त राष्ट्रात उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करत भारताचे सचिव मिजितो विनितो यांनी म्हटलं की, काश्मीर प्रकरणी आता फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होणं बाकी आहे. तत्पूर्वी पाकचे पंतप्रधान इमरान खान यांचे भाषण सुरु होताच भारताचे प्रतिनिधी मिजितो विनितो यांनी महासभेच्या हॉलमधून वॉकआउट करत विरोध दर्शवला होता.

हे वाचा - UN महासभेत भारताने पाकला दाखवली जागा; इमरान खान यांच्या भाषणावेळी केलं वॉकआऊट

विनितो म्हणाले की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आज त्या लोकांना आवाहन केलं आहे जे द्वेष आणि हिंसाचारासाठी भडकावत आहे. या हॉलने अशा व्यक्तीला ऐकलं ज्याच्याकडे स्वत:चं असं दाखवण्यासाठी काहीच नव्हतं. बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कर्तृत्व नव्हतं आणि जगाला देण्यासाठी कोणताच सल्ला नव्हता. याशिवाय फक्त खोटं, चुकीची माहिती, धमक्या आणि द्वेष एवढंच पसरवण्याचं काम त्यांनी या माध्यमातून केलं. ज्या नेत्याने देशाच्या संसदेत दहशतवादी ओसामा बिन लादेन एक 'शहीद' म्हटलं अशा व्यक्तीला आपण इथं ऐकलं. हा तोच देश आहे जो निधीचा वापर दहशतवाद्यांना पेन्शन देण्यासाठी करतो. 

पाकव्याप्त काश्मीरवरचा अवैध ताबा सोडा
पाककडून अनेकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर मुद्दा पुढे करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यावरून पाकला खडसावताना विनितो म्हणाले की, ज्या नेत्याने विष ओकलं त्याच नेत्याने 2019 मध्ये अमेरिकेत सर्वांसमोर मान्य केलं होतं की देशात अजुनही 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. ज्यांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिलं आहे. अफगाणिस्तान आणि जम्मू काश्मीरमध्ये लढत आहेत. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. उर्वरित काश्मीर जो पाकच्या ताब्यात आहे त्यावरून वाद आहे. पाकने जो अवैध ताबा मिळवला आहे तो भागही रिकामा करावा असं विनितो यांनी सुनावलं.

अल्पसंख्यांकावर अत्याचार
पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर होणाऱ्या अत्याचाराकडेसुद्धा विनितो यांनी लक्ष वेघलं. पाकिस्तानकडे गेल्या 70 वर्षांमध्ये दहशतवाद, कट्टरता, अवैध अणु व्यापार याशिवाय दुसरं काहीच नाही. पाकिस्तानला एक सामान्य देश व्हायचं असेल तर दहशतवादाचं समर्थन बंद करायला हवं आणि त्यांच्या देशातील समस्यांकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं विनितो यांनी सांगितलं.