अखेर 'ब्रेक्झिट'वर शिक्कामोर्तब; मध्यरात्री प्रक्रिया पूर्ण

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर जॉन्सन यांनी देशाला उद्देशून भाषण ही केले.

लंडन : युरोपीय महासंघाचा (ईयू) सदस्य म्हणून ब्रिटनचा आजचा (ता. 31) अखेरचा दिवस ठरला. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी रात्री अकरा वाजता ब्रिटन अधिकृतपणे "ईयू'मधून बाहेर पडले असून, ब्रेक्‍झिटची ही प्रक्रिया "ईयू'चे मुख्यालय असलेल्या ब्रुसेल्समध्ये पार पडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रेक्‍झिटच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यानंतर जॉन्सन यांनी देशाला उद्देशून भाषण ही केले. ब्रेक्‍झिट हा शेवट नसून सुरुवात आहे, असे जॉन्सन यांचे मत असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ब्रेक्‍झिटच्या बाजूने कौल मिळाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी हा देश "ईयू'मधून अधिकृतरीत्या शुक्रवारी बाहेर पडला. ब्रेक्‍झिटसाठी झालेल्या सार्वमतावेळी ब्रिटिश नागरिकांनी 52 विरुद्ध 48 टक्के असा कौल दिला होता. ब्रिटन 1973मध्ये "ईयू'चा सदस्य बनला होता.

जगभरातील आणखी घडामोडी वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

"ईयू'मधून बाहेर पडलेला ब्रिटन हा पहिलाच देश ठरला आहे. आजचा दिवस हा आमच्यासाठी दुःखदायक होता, अशी प्रतिक्रिया "ईयू'च्या इतर सदस्य देशांमधून उमटली. ब्रुसेल्स येथील "ईयू'च्या मुख्यालयात युरोपीयन कौंसिलचे अध्यक्ष चार्ल्स मायकल आणि युरोपीयन महासंघाचे नेते उर्सुला व्होन डेर लेयेन हे ब्रेक्‍झिटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची "ईयू'ची वाटचाल कशी असेल याची रूपरेखा तयार करणार आहे. ब्रिटन बाहेर पडल्याने "ईयू'च्या सदस्य देशांची संख्या आता 28 वरून 27 झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: united kingdom leaves european union