संयुक्त राष्ट्रांनी जगाला काय दिले?

पीटीआय
Friday, 25 September 2020

मोठ्या देशांच्या प्रश्‍नांनाच महत्त्व आणि प्रसिद्धी दिली जात असून जगात चीन, अमेरिका, रशिया, युरोपशिवाय इतरही अनेक देश असून त्यांच्यासमोरही गहन समस्या आहेत. 

न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रांना ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महासभेने या जागतिक संस्थेला अंतर्मुख होण्यास भाग पाडले आहे. केवळ मोठ्या देशांच्या प्रश्‍नांनाच महत्त्व आणि प्रसिद्धी दिली जात असून जगात चीन, अमेरिका, रशिया, युरोपशिवाय इतरही अनेक देश असून त्यांच्यासमोरही गहन समस्या आहेत. 

बड्या देशांनी या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्यास जगात शांतता नांदण्यास मोठी मदत होईल. तसेच, वास्तव जगाचे प्रतिनिधीत्व संयुक्त राष्ट्रांमध्ये येण्यासाठी या संस्थेत तत्काळ सुधारणा करण्याची गरज असल्याची मागणीही पुन्हा एकदा करण्यात आली. कझाकस्तान, घाना या देशांनी कोरोना काळात मदत करण्याचे आवाहन केले. तर, सौदी अरेबिया या श्रीमंत देशाने इतरांना मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही संस्था म्हातारी : केनिया
संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याची ठसठशीत जाणीव केनियाने महासभेला करून दिली. ही जागतिक संस्था जगभरातील ९६ टक्के लोकसंख्येपेक्षा अधिक वयस्कर आहे, असे केनियाचे अध्यक्ष उहुरु केनियट्टा यांनी निदर्शनास आणून दिले. ‘दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांनी जगाला एकत्र आणले होते. मात्र, आताच्या परिस्थितीत ही संस्था जगाला काय देत आहे?,’ असा सवाल त्यांनी विचारला. आफ्रिका खंडात जगातली सर्वाधिक तरुण लोकसंख्या असून अधिक पटींनी वय असणाऱ्या नेत्यांवर हे तरुण नाराज आहेत. जगातील एक षष्ठांश लोकसंख्या आफ्रिका खंडात असताना आम्हाला संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमस्वरुपी सदस्यत्व नाही, हे चुकीचे आहे, असे केनियट्टा यांनी ठणकावून सांगितले.  

दरम्यान, आधीच कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेमुळे आणि अंतर्गत संघर्षामुळे त्रस्त झालेल्या लेबनॉनला बैरुतमध्ये झालेल्या विनाशकारी स्फोटामुळे धक्का बसल्याने घायकुतीला आलेल्या सरकारने जगाकडे मदतीची याचना केली आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रसायनांच्या गोदामात झालेल्या स्फोटामुळे लेबनॉनचे प्रचंड नुकसान झाले आहे. अध्यक्ष मायकेल ओउन यांनी आव्हानांचा पाढा वाचताना या देशाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्‍यकता असल्याचे ओउन यांनी म्हटले आहे.

कोरोनामुक्त, तरीही चिंताग्रस्त
जगातील सर्वांत लहान देशांपैकी एक असलेल्या पलाऊ बेटाचे अध्यक्ष टॉमी ई. रेमेनगेसाऊ यांनी आपला देश कोरोनामुक्त असला तरी संसर्गाची झळ बसल्याचे महासभेत सांगितले. ‘आंतरराष्ट्रीय यंत्रणेत कोणताही देश सर्वांपासून फटकून राहू शकत नाही आणि प्रत्येकालाच आधाराची आवश्‍यकता असते. कोरोनामुळे आमचा देश एकटा पडला असून अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. आम्हाला आर्थिक सहकार्याची आवश्‍यकता आहे,’ असे रेमेनगेसाऊ म्हणाले. पर्यावरणसमृद्ध पलाऊ बेटांना पर्यावरण बदलाचीही चिंता वाटत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United Nations give to the world