कोरोनाविरुद्धच्या लढाईत आणखी एक चांगली बातमी; संशोधकांनी तयार केलं Ab8 औषध

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना कोरोनाच्या उपचारात मोठं यश मिळालं आहे.

पिट्सबर्ग - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी लस कधी येणार याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, अनेक देशांमध्ये रेमडेसिवीर औषधांचा वापर केला जात आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. आता अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना कोरोनाच्या उपचारात मोठं यश मिळालं आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार या औषधाचा वापर करून सर्वात लहान अशा बायोलॉजिकल मॉलिक्यूल वेगळे करता येतात. त्यातून कोरोनावर मात करता येणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. 

संशोधकांनी एका मॉलिक्यूलच्या मदतीने एबी8 नावाचं औषध तयार केलं आहे. खरंतर हा एक अँटिबॉडिचाच भाग आहे. सर्वसामान्य अँटिबॉडीजपेक्षा हे 10 पट लहान आहे. याची चाचणी सर्वात आधी उंदरावर करण्यात आली. त्यात कोरोनापासून संसर्गाचा दोका 10 टक्के कमी झाल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. मॉलिक्यूल मानवी पेशांच्या संपर्कात येत नसल्यानं त्याचे दुष्परिणाम होत नाहीत असा दावा संशोधकांनी केला आहे. त्यामुळे कोरोनावर हे औषध प्रभावी ठरू शकतं असं संशोधकांनी म्हटलं आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गच्या व्हायरालॉजी विभागाचे प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार AB8 हे औषध कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये एका थेरपीसारखं काम करेल. तसंच ते प्रभावी ठरेल असंही त्यांनी सांगितलं. लवकरच या औषधाची मानवी चाचणी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

हे वाचा - आंनदाची बातमी! कोविड लस एका महिन्यात येणार; ट्रम्प यांनी केलं जाहीर

जगभरात कोरोनावर लशींचा शोध सुरू असून अनेक लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात आहेत. दुसरीकडे रशियाने त्यांची पहिली लस लाँचही केली आणि दुसऱ्या लशीची तयारी सुरु असल्याची घोषणासुद्धा केली आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनका तयार करत असलेल्या कोरोनावरील लशीची चाचणी सध्या सुरु आहे. भारतातही सीरम इन्स्टिट्यूट या लशीची मानवी चाचणी घेत आहे. याशिवाय भारतातील तीन लशी मानवी चाचणीच्या टप्प्यात असल्याची माहिती आयसीएमआरने नुकतीच दिली आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोरोनावरील लस उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Pittsburgh School of Medicine Ab8 fight against corona