US Capitol : चार मृत्यू, 52 ट्रम्प समर्थक अटकेत; वॉशिंग्टनमध्ये 15 दिवसांची आणीबाणी जाहीर

Trump
Trump

वॉशिंग्टन : अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी US कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली आहे. US Capital मध्ये घूसू पाहणारे ट्रम्प समर्थक आणि पोलिस यांच्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. आधी मृत झालेल्या आंदोलक महिलेसह इतर तीन जणांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपला जीव गमवावा लागला, अशी माहिती वॉशिंग्टन डीसीच्या पोलिसांनी दिली. या साऱ्या गोंधळाला जबाबदार धरुन 52 जणांना अटक करण्यात आली आहे. या निदर्शकांनी सुरक्षा नियमांचा भंग करून आवारात प्रवेश केल्यावर संसदेतील खासदारांना अमेरिकेच्या कॅपिटलमधून थोडक्यात हलवले गेले. ट्रम्प यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या समर्थकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की, व्यापक पातळीवर झालेल्या घोटाळ्यामुळेच त्यांचा पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटलमध्ये हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्याच्या शक्यतेवर चर्चा होत आहे. अमेरिकन राज्यघटनेतील 25 व्या दुरुस्तीनुसार, आपल्या पदाचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ ठरल्यास अध्यक्षांना उपराष्ट्रपती आणि मंत्रिमंडळाद्वारे काढून टाकण्याची परवानगी देता येते. दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी 15 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. 

हातात अमेरिकेचे झेंडे आणि घोषणा देत आत घुसखोरी करणाऱ्या ट्रम्प समर्थकांनी चांगलाच गोंधळ घातला. निदर्शकांनी सुरक्षा नियमांचा भंग करून आवारात प्रवेश केल्यावर परिस्थिती हाताबाहेर गेली. घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीबद्दलचा हा वितंडवाद मतमोजणी सुरु झालेल्या दिवसापासून सातत्याने सुरुच आहे. 

आधी जाणून घेऊयात की नेमकं काय घडलं?
गेल्या 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या मतमोजणीवर संशय घेत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तरीही या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांचाच विजय झाल्याचे चित्र होते. या निवडणुकीत झालेल्या विजयाला औपचारिकरित्या घोषित करण्यासाठी सत्र सुरु होतं. मात्र, रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी काही राज्यांतील निकालावर नाराजी व्यक्त करत प्रश्न उभे केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांच्यावर दबाव टाकत होते की त्यांनी बायडन यांना विजयाचे सर्टीफिकेट देऊ नये. अशा परिस्थितीत तणाव वाढत गेला. जेंव्हा अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये हे सत्र सुरु होतं तेंव्हाच ट्रम्प समर्थकांच्या हिंसक झुंडीने बॅरिकेड्सची तोडफोड करत आत प्रवेश केला. पोलिसांशी त्यांची झटापट झाली. यातील अनेक समर्थकांकडे हत्यारे होती.  ट्रम्प समर्थकांनी खिडक्या तोडल्या आणि पोलिसांशी दोन हात केले. या दरम्यानच एका आंदोलक महिलेला गोळी लागून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांत राहून जाण्यास सांगितले मात्र ही गोष्ट देखील अधोरेखित केली या निवडणुकीत त्यांचाच विजय झाला आहे. 

ही परिस्थिती का उद्भवली?
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यापासूनच या निवडणुकीवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. तीन नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरु असतानाच आपली पीछेहाट होते आहे, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. तेंव्हाच त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये फसवणूक झाल्याचा कांगावा सुरु केला. ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेऊन अनेक राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. या साऱ्यामुळे अमेरिकेच्या निकालाची अंतिम आकडेवारी यायला उशीर झाला. पण सरतेशेवटी विक्रमी मताधिक्याने डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांचाच विजय झाला. मात्र, तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी आपणच विजयी झाल्याचा हेका सोडला नव्हता. समर्थकांना ते नेहमीच असे सांगत राहिले की आपण बरोबर आहोत, आणि यंत्रणा चुकत आहे. आज देखील ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं. त्यांनी म्हटलं की या आंदोलनात हिंसा व्हायला नको. लक्षात ठेवा की आपण कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पक्षाचे सदस्य आहोत. हे सारं वरकरणी असलं तरीही त्यांनी आपल्या समर्थकांना उकसावणं थाबवलं नाही. या साऱ्यामुळे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने त्यांचे अकाउंट्स काही काळासाठी स्थगित केले आहेत.

या एकूण प्रकारावर राष्ट्राध्यक्ष पदी नवनिर्वाचित होणारे जो बायडन यांनी संताप व्यक्त केला. विलमिंगटनमधून बोलताना जो बायडन यांनी म्हटलंय की मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन करतो की त्यांनी घेतलेल्या शपथेनुसार संविधानाचे संरक्षण करावे आणि या गोंधळाला लवकरात लवकर आवरतं घ्यावं. त्यांनी म्हटलं की, लोकशाही अप्रत्यक्षपणे धोक्यात आहे. मी विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना विनंती करतो कि त्यांना नॅशनल टीव्हीवर जाऊन आपल्या शपथेचं पालन करावं आणि संविधानाचे संरक्षण करावं. कॅपिटलवरील या हल्ल्याला तसेच गोंधळाला समाप्त करावं. कॅपिटलमध्ये घुसून खिडक्या तोडणे, फ्लोअरवर ताबा घेणे आणि उलथापालथ माजवणे हा देशद्रोह आहे. 

आता पुढे काय?
या साऱ्या घटनेनंतरही राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन हेच राहणार आहेत. व्हाईट हाऊसच्या किल्ल्या 20 जानेवारी रोजी त्यांच्या ताब्यात येतील. ट्रम्प यांना त्यांच्या या हेकेखोरपणाचा किंचितही फायदा न होता उलट तोटाच झाला आहे. त्यांनाच नव्हे तर येत्या काळात त्यांच्या पक्षालाही याचा तोटा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटलमध्ये हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्याच्या शक्यतेवर चर्चा होत आहे. अमेरिकेसारख्या सर्वांत जुन्या आणि मोठ्या लोकशाहीत घडलेल्या या प्रकारामुळे लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वच देशांनी भुवया उंचावल्या आहेत. या प्रकारामुळे अमेरिकेची थेट नाच्चकी झाली असून सुदृढ लोकशाहीच्या गौरवाला गालबोट लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com