द. चिनी समुद्रात अमेरिकेची लढाऊ विमाने;चीनला थेट आव्हान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

दक्षिण चिनी समुद्राच्या 90 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितला असून चीनच्या या दांडगाईस आग्नेय आशियातील इतर देशांनी विरोध दर्शविला आहे. या भागामध्ये लढाऊ जहाजे वा विमानांच्या वाहतूक झाल्यास चीनकडून आक्षेप घेण्यात येतो

वॉशिंग्टन - चीनचा दावा असलेल्या दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रावरुन अमेरिकेची दोन लढाऊ बॉंबर विमाने उडाल्याचे अमेरिकन हवाई दलातर्फे आज (शुक्रवार) स्पष्ट करण्यात आले.

जर्मनीत होणाऱ्या "जी-20' परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात चर्चा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून उचलण्यात आलेले हे पाऊल अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

दोन्ही नेत्यांच्या चर्चेमधील मुख्य मुद्दा उत्तर कोरियाकडून करण्यात आलेली क्षेपणास्त्र चाचणी व चीनची यासंदर्भातील भूमिका, हा असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर कोरियाकडून नुकतीच "आंतरखंडीय क्षेपणास्त्रा'ची चाचणी करण्यात आल्याने अमेरिकेकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. या यशस्वी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अमेरिकेची भूमी प्रथमच उत्तर कोरियन क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आल्याचे मानले जात आहे.

दक्षिण चिनी समुद्राच्या 90 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त भागावर चीनने दावा सांगितला असून चीनच्या या दांडगाईस आग्नेय आशियातील इतर देशांनी विरोध दर्शविला आहे. या भागामध्ये लढाऊ जहाजे वा विमानांच्या वाहतूक झाल्यास चीनकडून आक्षेप घेण्यात येतो. या भागामधील बेटांवर चीनकडून लष्करी तळही बांधण्यात आले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकेकडून चीनचा या दाव्यास पुन्हा एकदा स्पष्ट विरोध दर्शविण्यात आला आहे.

Web Title: US bombers challenge China in South China Sea