डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, "भारत आणि चीन दोघांवर माझं प्रेम"

कार्तिक पुजारी
Friday, 17 July 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की भारत आणि चीनमधील वाद मिटवण्यासाठी ते शक्य ती मदत करु इच्छितात.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रवक्त्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की भारत आणि चीनमधील वाद मिटवण्यासाठी ते शक्य ती मदत करु इच्छितात. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाची स्थिती आहे. अशात अमेरिकेने भारताची बाजू घेत चिनला सुनावलं आहे. व्हाईट हाऊसच्या सचिव केलेघ मैर इनेनी यांनी गुरुवारी एका संमेलनात म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की ते भारतातील लोकांवर प्रेम करतात आणि चीनमधील लोकांवरही ते प्रेम करतात. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये शांतीची स्थिती निर्माण व्हावी यासाठी ते शक्य ते प्रयत्न करणार आहेत.

भारत आणि चीन देशांमधील निवळत असलेला तणाव पुन्हा वाढला
केलेघ मैक इनेनी यांना पत्रकारांनी भारत आणि चीनदरम्यान लडाखमध्ये  निर्माण झालेल्या वादाविषयी विचारलं होतं. तसेच डोनाल्ड ट्रम्प भारताला काय संदेश देऊ इच्छितात असा सवाल त्यांना करण्यात आला होता. यावर इनेनी यांनी ट्रम्प दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं म्हटलं आहे. याआधी व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार लैरी कुडलॉ यांनी म्हटलं की, भारत अमेरिकेचा मित्र आहे. शिवाय राष्ट्रपती ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चांगले मित्र आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या 244 व्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देताना अमेरिकेचे भारतावर प्रेम असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकेत 4 जूलै रोजी स्वतंत्रता दिवस साजरा केला जातो. अमेरिकेने याच दिवशी 1776 मध्ये ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं होतं. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

मोदींच्या या ट्विटला प्रतिसाद म्हणून अमेरिकेतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. भारत आणि अमेरिका जगातील सर्वात मोठे लोकशाही देश आहेत. मोदी यांना मुल्यवान मित्राच्या रुपात आम्ही पाहतो, असं ट्रम्प विक्टरी इंडियन-अमेरिकन फाईनेंस कमेटीचे अध्यक्ष अल मासोन म्हणाले होते.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे उद्यापासून ‘अनलॉक’
दरम्यान, 15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्यानंतर अमेरिकेने चीनच्या या कृतीचा निषेध करत भारताचे समर्थन केले होते. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो यांनी चीनवर टीकास्त्र सोडताना कम्युनिस्ट पार्टीने आपला खरा चेहरा दाखवल्याचं म्हटलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us donald trump said i love india and china both