esakal | US Election : पराभव न स्वीकारणं हे राष्ट्राध्यक्षांच्या परंपरेला लाजिरवाणं; बायडन यांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

joe biden us president

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव होताना पाहून बराच थयथय्याट केला होता.

US Election : पराभव न स्वीकारणं हे राष्ट्राध्यक्षांच्या परंपरेला लाजिरवाणं; बायडन यांचा टोला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक यंदा अटीतटीची झाली. रिपब्लिक पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडेन यांनी तगडे आव्हान दिले. अमेरिकेच्या जनतेने त्यांना भरघोस मतांनी विजयीही केले. मात्र, असं असलं तरीही विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव अद्याप स्विकारलेला नाहीये. निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यानच त्यांनी मतमोजणी थांबवण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांच्या बाजूने काही घडामोडी सकारात्मकरित्या घडल्या नाहीत. आता यावर जो बायडन यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, स्वत:चा पराभव मान्य करण्यास नकार देण्याचं ट्रम्प यांचं वागणं हे लाजिरवाणे आहे, तसेच ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या परंपरेला नुकसान पोहोचवणारे आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - कोरोना लशीची घोषणा करणाऱ्या फायझर कंपनीवर ट्रम्प भडकले

बायडेन यांनी हे वक्तव्य आपल्या मतदारसंघात म्हणजेच डेलावेयर येथे बोलताना केलं आहे. त्यांनी म्हटलंय, मला असं वाटतं की हे लाजिरवाणं आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या परंपरेला हे नुकसान पोहोचवणारे आहे, असं मला स्पष्टपणे वाटतं. पुढे त्यांनी असंही म्हटलंय की पण अंतिमत: 20 जानेवारी रोजी सगळं काही ठिक होईल. मला आशा आहे की अमेरिकेच्या सर्व लोकांना हे कळलं आहे की परिवर्तन झालेलं आहे. 


बायडेन यांनी पुढे म्हटलंय की, ट्रम्प यांना मतदान करणाऱ्यांच्या भावनांना आपण जाणतो. अनेकांना देशाला एकत्र आणायचं होतं. आता त्यांना कळत असेल की आपल्या सर्वांना एकत्र यावं लागेल. मला वाटतंय आता ते एकत्र यायला तयार आहेत. तसेच याद्वारे आपण गेल्या चार-पाच वर्षात बघितलेल्या देशातील सगळ्या कडव्या राजकारणाला बाहेर निश्चितच काढू शकतो, असाही विश्वास बायडन यांनी व्यक्त केला आहे. 

हेही वाचा - बायडेन यांचे अभिनंदन करण्यास चीनचा नकार

यावेळी त्यांना राष्ट्राध्यक्षांविरोधात कायदेशीर कारवाईबाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, मला कायदेशीर कारवाईची गरजच नाही. कारण कायदेशीर कार्यवाही सुरुच आहे जे आपण पाहत आहात. अद्यापतरी डोनाल्ड ट्रम्प आणि माईक पोम्पिओ यांनी केलेल्या कोणत्याही दाव्याबाबत कसलाही पुरावा समोर आलेला नाहीये. रिपब्लिक पार्टीला आपला विजय स्विकारावा लागेल, असंही त्यांनी म्हटलंय. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव होताना पाहून बराच थयथय्याट केला होता. अंतिम निकाल समोर यायच्या आधीच फिरलेले वारे पाहून त्यांनी रडगाणे सुरु केले होते. मतमोजणीलाच आव्हान देत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक अद्याप संपलेली नाहीये. निकालाला आव्हान देणारे अनेक खटले कोर्टात दाखल आहेत. 

loading image
go to top