US Election - ट्रम्प म्हणतात निवडणुकीत चोरी तर बायडेन यांना जिंकण्याचा विश्वास; पण निकाल कधी?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

निकाल समोर येणं बाकी असलेल्या राज्यांमध्ये पेन्सिल्वेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा आणि विस्कॉन्सिनचा समावेश आहे. यापैकी नेवाडा वगळता इतर राज्यांमध्ये ट्रम्प यांचा दबदबा आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या (US Election) निवडणुकीचा निकाल दोन दिवस झाले तरी लागलेला नाही. अद्याप 5 राज्यांचा निकाल लागायचा आहे. दरम्यान, जो बायडेन (Joe Biden) हे विजयापासून 6 पावलं दूर आहेत. त्यांनी आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये विक्रमी मते मिळवली आहेत. बायडेन यांना 264 इलेक्टोरल मते मिळाली असून ट्रम्पना (Donald Trump) 214 मते मिळाली आहेत. सत्ता हातातून जात असल्याचं दिसताच ट्रम्प यांनी न्यायालय गाठलं असून मतमोजणीत गैरव्यवहार झाल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांचं हे म्हणणं याआधी निवडणूक निरीक्षकांनी फेटाळून लावलं आहे. त्यामुळे न्यायालयात आता काय होणार याकडे लक्ष लागलं आहे. 

अमेरिकेतील एकूण राज्यांपैकी निकाल समोर येणं बाकी असलेल्या राज्यांमध्ये पेन्सिल्वेनिया, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा आणि विस्कॉन्सिनचा समावेश आहे. यापैकी नेवाडा वगळता इतर राज्यांमध्ये ट्रम्प यांचा दबदबा आहे. त्यामुळे या राज्यात ट्रम्प यांनी बाजी मारली तर बायडेन यांच्याशी ते बरोबरी साधू शकतात. दुसरीकडे नेवाडा इथं बायडेन आघाडीवर असून तिथल्या निकालावरच विजयाचा मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, मतमोजणीत गैरव्यवहाराचा आरोप करत ट्रम्प यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आता न्यायालय काय निर्णय देणार यावर निकाल कधी हाती येतील हे ठरणार आहे. ट्रम्प यांच्या विरोधात न्यायालयाने निर्णय दिल्यास आठवड्याभरात निवडणुकीचा निकाल लागेल असं म्हटलं जात आहे. सध्या मतमोजणी बाकी असलेल्या राज्यांमधील मतमोजणी 6,9 आणि 12 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 नोव्हेंबरला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण हे स्पष्ट होऊ शकते.

हे वाचा - US Election - ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या; मतमोजणीत घोटाळ्याचा आरोप निवडणूक निरीक्षकांनी फेटाळला

ट्रम्प यांनी गुरुवारी म्हटलं की, अधिकृत मतांची मोजणी केली तर मी सहज विजयी होईन. आधीच अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे. यात ऐतिहासिक मतंही मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला. आम्ही सहज जिंकू. आम्ही कधीच अशा प्रकारे निवडणुकीची चोरी केली नाही असं म्हणत ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर पुन्हा आरोप केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election 2020 donald trump allegation biden steal election