US Election : गेल्या 100 वर्षांतील सर्वाधिक मतदान; ट्रम्प-बायडेन यांच्यात चुरशीची टक्कर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

बऱ्यापैकी सर्व निवडणूक पुर्व अंदाजांनी ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन हेच आघाडीवर असल्याचा निर्वाळा दिला होता. सध्या दोघांमध्ये काट्याची टक्कर सुरु आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, जो बायडेन यांनी सध्या 10 राज्यांत विजय प्राप्त केला आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत 8 राज्यांत विजय मिळविला आहे. यावेळच्या निवडणुकीत 160 मिलियन म्हणजेच 16 कोटीहून अधिक लोकांनी मतदान केलं आहे. जवळपास 67 टक्के लोकांनी मतदान केलं आहे. जे गेल्या 100 वर्षांतील आतापर्यंतच्या निवडणुकीतील सर्वांत जास्त मतदान आहे. ट्रम्प आणि बायडेन हे मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांना मतदान करण्याची विनंती करत होते. 

अमेरिकेत जवळपास 40 लाख भारतीय वंशाचे लोक आहेत. यापैकी जवळपास 25 लाख लोक मतदानास पात्र आहेत. 13 लाखहून अधिक भारतीय-अमेरिकन लोक हे टेक्सास, मिशिगन, फ्लोरिडा आणि पेनसिल्वेनियासारख्या महत्वाच्या राज्यात मतदार आहेत. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत:चा एक नाचतानाचा व्हिडीओ शेअर करत मतदान करा... मतदान करा... मतदान करा... असं आवाहन केलं होतं. 

हेही वाचा - US election 2020: सारा मॅकब्राईड अमेरिकेतील पहिल्या ट्रान्सजेंडर सिनेटर

जो बायडेन यांनीदेखील मतदान करण्याची विनंती करुन म्हटलं की, मतदानाचा दिवस आहे. जा आणि मत द्या अमेरिका... त्यांनी म्हटलं की, 2008 आणि 2012 मध्ये आपण देशाचे नेतृत्व करण्यासाठी बराक ओबामांची सोबत देण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला होता. आज मी पुन्हा एकदा आपल्याकडून माझ्यावर विश्वास ठेवण्याची विनंती करत आहे. माझ्यावर आणि कमला हॅरिसवरदेखील विश्वास ठेवा. मी आपल्याला वचन देतो की आम्ही आपल्याला निराश करणार नाही. 

हेही वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने काश्मीरला दाखवलं पाकचा भाग

उपराष्ट्रपती पदाच्या डेमोक्रॅटीक उमेदवार कमला हॅरिस यांनी मतदारांना म्हटलं की, जर आपण मतदान केलं असेल तर आभार. मात्र आम्हाला आपल्या मदतीची अपेक्षा आहे. 20 मिनिट काढा आणि मतदारांना मतदान केंद्र शोधण्यास मदत करा. बऱ्यापैकी सर्व निवडणूक पुर्व अंदाजांनी ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन हेच आघाडीवर असल्याचा निर्वाळा दिला होता. सध्या दोघांमध्ये काट्याची टक्कर सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election america witnessed highest voter turnout in century