मी शांत बसणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे रडगाणे सुरुच

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 November 2020

ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापही हार मानण्यास तयार नाहीत.

वॉशिंग्टन- ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापही हार मानण्यास तयार नाहीत. मतमोजणीचा प्रामाणिक आणि खरा निकाल अमेरिकी जनतेसमोर जाहीर होत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. बायडेन यांच्याविरोधात न्यायालयीन लढाया सुरु करण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला आहे.

अत्यंत अटीतटीच्या आणि विक्रमी मतदान झालेल्या निवडणुकीत बायडेन-हॅरिस जोडीने ट्रम्प-माइक पेन्स जोडीचा पराभव केला. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीपासूनच टपालाद्वारे मतदानाला विरोध केला होता. मात्र, कोरोनामुळे यंदा प्रचंड संख्येने टपालाद्वारेच मतदान करत नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्यामुळे ट्रम्प यांनी मतमोजणी, टपालाद्वारे मते गोळा करण्याची तारीख यावर आक्षेप घेत न्यायालयात याचिकाही दाखल केल्या. त्यातील काहींचा निकाल त्यांच्याविरुद्धही लागला. ही निवडणूक आपल्यापासून ‘चोरून’ नेली आहे, अशी टीकाही त्यांनी वारंवार केली आहे. 

अध्यक्षपद गेल्यानंतर ट्रम्प यांचे फिरले दिवस; बायकोही सोडणार साथ!

वृत्तवाहिन्यांनी बायडेन यांना विजयी घोषित केल्यानंतर ट्रम्प यांनी विरोधाचे शस्त्र उपसले आहे. ‘वृत्तवाहिन्या नव्हे, वैध मतेच देशाचा अध्यक्ष ठरवतील. सोमवारपासून आम्ही विविध राज्यांमधील न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यास सुरुवात करणार आहोत. निवडणूक कायद्यांचे पालन होणे आणि खरा विजेता जाहीर होणे आवश्‍यकच आहे, ’ असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

अमेरिकी जनतेला निवडणूकीचा खरा निकाल समजणे आवश्‍यकच आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ‘प्रत्येक वैध मत मोजलेच गेले पाहिजे, अवैध नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने माध्यमे आणि तंत्रज्ञान कंपन्यांना हाताशी धरून माझ्याविरोधात खेळी केली आहे,’ असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. बायडेन यांनी अर्थातच तो फेटाळून लावला आहे. मात्र, गैरप्रकार करूनही बायडेन इन्कार करतात, याबद्दल ट्रम्प यांनी आश्‍चर्य व्यक्त करत न्यायालयातच खरा निकाल लागेल आणि तोच मार्ग शिल्लक आहे, असे म्हटले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump said i will not accept loss