काय सांगता! जिथं कोरोनाचा उद्रेक झाला, त्या राज्यातच ट्रम्प यांचा दणदणीत विजय

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

यंदाच्या निवडणुकीत कोरोना संसर्गावरील नियंत्रणाचा मुद्दा चांगलाच गाजला.

वॉशिंग्टन- यंदाच्या निवडणुकीत कोरोना संसर्गावरील नियंत्रणाचा मुद्दा चांगलाच गाजला. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुर्लक्ष केल्यानेच देशात संसर्ग वाढल्याचे आरोप होत असताना आणि ट्रम्प यांच्या प्रचारसभांमुळे अनेक जणांना संसर्ग झाल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला असताना आणखी एका अहवालाने सर्वांना चक्रावून टाकले आहे. 

‘असोसिएटेड प्रेस’ने मतमोजणीनंतर घेतलेल्या सर्वेक्षणानुसार, अमेरिकेत ज्या ठिकाणी कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक झाला होता, त्या ठिकाणी ट्रम्प यांना प्रचंड मते मिळाली आहेत.

या अहवालानुसार, देशातील ज्या ३७६ कौटींमध्ये दरडोई कोरोनाबाधितांची संख्या सर्वोच्च होती, त्या ठिकाणांपैकी ९३ टक्के जागांवर ट्रम्प विजयी झाले आहेत. यातील अनेक कौंटी या डाकोटा, माँटाना, नेब्रास्का, विस्कॉन्सिन आणि आयोवा या राज्यांतील ग्रामीण भागातील आहेत. या अहवालामुळे सरकारी अधिकारी आणि डॉक्टरही चाट पडले असून या आणि आधीच्या अहवालांचा अभ्यास करण्याचा, तसेच आत्मपरीक्षण करण्याचा निर्णय त्यातील अनेकांनी घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करतानाच त्यांनी नव्याने मार्गदर्शक सूचना आखण्याची तयारी दर्शविली आहे.

बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम

हे सर्वेक्षण केवळ कोरोनाचा उद्रेक झालेल्या भागापुरतेच मर्यादित होते. येथे ३७ टक्के ट्रम्प समर्थकांनी कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. बायडेन यांच्या समर्थकांपैकी ८२ टक्के जणांनी मात्र संसर्ग वाढणार असल्याचे सांगितले. रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव असलेल्या अलाबामा, मिसौरी, मिसीसिपी, केन्टुकी, टेक्सास, टेनेसी आणि दक्षिण कॅरोलिना या राज्यांमधील निम्म्याहून अधिक मतदारांना साथ नियंत्रणात असल्याचे वाटत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump win in more corona patients state