बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर मोठी जबाबदारी; लवकरच होणार घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 November 2020

अध्यक्षीय निवडणूकीच्या प्रचारात सर्वोच्च प्राधान्य दिलेल्या मुद्द्यावर कार्यवाही करण्यास ज्यो बायडेन लवकरच प्रारंभ करणार आहेत.

वॉशिंग्टन- अध्यक्षीय निवडणूकीच्या प्रचारात सर्वोच्च प्राधान्य दिलेल्या मुद्द्यावर कार्यवाही करण्यास ज्यो बायडेन लवकरच प्रारंभ करणार आहेत. सोमवारी ते कोविड-१९ कृती समितीची घोषणा करणार असून सहअध्यक्षपदी भारतीय वंशाच्या डॉ. विवेक मूर्ती यांची नियुक्ती होण्याची अपेक्षा आहे.

सत्तेवर येताच बायडेन अनेक कार्यकारी आदेश जारी करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाचे निर्णय मागे फिरविण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेला सर्वाधिक ग्रासलेल्या कोरोना साथीविरुद्ध ते ठोस पावले उचलणार आहेत. यादिशेने पहिले पाऊल म्हणून ते १२ सदस्यांची समिती स्थापन करतील. त्यात अन्न-औषध प्रशासनाचे माजी आयुक्त डेव्हिड केसलर आणि येल विद्यापीठाच्या प्राध्यापिका डॉ. मार्सेला नूनेध-स्मिथ यांच्या साथीत मूर्ती यांच्याकडे सूत्रे असतील असे वृत्त आहे.

कोरोना निर्मूलनाच्या आश्वासनावर बायडेन यांनी प्रचारात भर दिला होता. त्याचवेळी ट्रम्प यांना या संकटाला पुरेसा प्रतिसाद देण्यात अपयश आले तसेच साथीच्या गांभीर्याबाबत त्यांनी पारदर्शकता राखली नसल्याची टीकाही बायडेन यांनी केली होती.

मेलेनिया सोडणार ट्रम्प यांची साथ? घटस्फोट घेण्याच्या तयारीत

शास्त्राला प्राधान्य अन् मुल्यांनाही

शनिवारी बायडेन यांनी विजयानंतर केलेल्या भाषणात श्वेतपत्रिकेचा उल्लेख केला. बायडेन-हॅरीस कोविड योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमुख संशोधक आणि तज्ञांची समिती स्थापण्यात येईल. कृती श्वेतपत्रिकेची अंमलबजावणी २० जानेवारीपासून सुरू होईल. ही योजना शास्त्राच्या पक्क्या पायावर आधारीत असेल. त्याचवेळी करुणा, सहानुभूती आणि काळजी अशा मूल्यांना त्यात स्थान असेल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले होते.

अमेरिकेचे डॉक्टर

- बराक ओबामा यांच्याकडून नियुक्ती
- १५ डिसेंबर २०१४ ते २१ एप्रिल २०१७ दरम्यान अमेरिकेचे महाशल्यविशारद
- सर्जन जनरल या पदास अमेरिकेचे डॉक्टर असेही संबोधले जाते
- गेली कित्येक महिने बायडेन यांना मूर्ती यांच्याकडून कोरोनाच्या जागतिक साथीबद्दल सल्ला
- काही सूत्रांच्या माहितीनुसार आठवड्यातून एकदा बायडेन यांची मूर्ती यांच्याशी चर्चा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election Indian origin man will get big responsibility in joe biden government