US President Election: मीच जिंकलो ! डोनाल्ड ट्रम्प यांना अजूनही पराभव अमान्य

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतर तब्बल 6 तास मौन साधल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन स्वतःच्या विजयाचा दावा केला आहे.

वॉशिंग्टन US President Election 2020- एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयाचा जल्लोष करत आहेत. तर दुसरीकडे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव अमान्य आहे. बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतर तब्बल 6 तास मौन साधल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन स्वतःच्या विजयाचा दावा केला आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. 

ट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले की, पर्यवेक्षकांना मतमोजणी खोलीत जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. ही निवडणूक मी जिंकली आहे आणि मला 7 कोटी 10 लाख वैध मते मिळाली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या आहेत. यापूर्वी असे कधीच झाले नाही.

ट्रम्प यांनी मेल इन बॅलेट्सच्या माध्यमातून बनावट मतदान झाल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे. टि्वटमध्ये त्यांनी पुढे म्हटले की, लाखोंच्या संख्येने नागरिकांना मेल-इन बॅलेट्स पाठवण्यात आली. विशेष म्हणजे या नागरिकांनी याची मागणीच केली नव्हती. 7 कोटी 10 लाख मतं...राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मिळालेली ही विक्रमी मतं आहेत. दरम्यान यापूर्वी ट्रम्प यांनी मेल-इन बॅलेट्सच्या मोजणीवर प्रश्न उपस्थित केले होते. 

हेही वाचा- अमेरिकेच्या जनतेनं दुसऱ्यांदा नाकारलेले ट्रम्प पाचवे राष्ट्राध्यक्ष; 1992 नंतरचे पहिलेच

ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीही स्वतः निवडणूक जिंकल्याची घोषणा केली होती. बनावट मतांच्या जोरावर निवडणूक चोरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जर तुम्ही वैध मते मोजली तर मी आरामात जिंकत आहे. पण जर तुम्ही अवैध (मेल इन बॅलेट्स) मतं मोजाल तर ते (डेमोक्रॅट) या माध्यमातून आमचा विजय हिसकावून घेण्याचा प्रयत्न करु शकतात, असे म्हटले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Us President election 2020 Donald Trump Has Not Accepted His Defeat Yet