मला भारतीय वारसा असल्याचा अभिमान- कमला हॅरिस

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 16 August 2020

अमेरिकेत उप-राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी पहिल्यांदाच भारतीय-अमेरिकी समुदायाला संबोधित केले.

वॉशिंग्टन- अमेरिकेत उप-राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी पहिल्यांदाच भारतीय-अमेरिकी समुदायाला संबोधित केले. आज 15, ऑगस्ट 2020 दिवशी मी भारतीय वंशाची महिला अमेरिकेच्या उप-राष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून उभी आहे. मला भारतीय वारसा असल्याचा अभिमान आहे. तसेच आईने 'चांगल्या इडली'बाबत माझ्यात प्रेम निर्माण करण्याचा नेहमीच प्रयत्न केला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. इंडियन्स फॉर बायडेन नॅशनल काऊंसिलद्वारा आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या

"राष्ट्रपती झालो, तर सीमेवरील सर्व धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतासोबत...

भारताच्या लोकांना आणि अमेरिकेतील भारतीय-अमेरिकी लोकांना मी स्वातंत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. संपूर्ण भारतात महिला आणि पुरुषांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाच्या स्वातंत्र्याच्या घोषणेचा उत्सव साजरा केला होता, असं हॅरिस यावेळी म्हणाल्या. हॅरिस यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँड येथे 20 ऑक्टोंबर 1964 मध्ये झाला. त्यांच्या आई श्यामला गोपालन तामिळनाडूतून अमेरिकेत आल्या होत्या. त्यांचे वडील डोनाल्ड जे हॅरिस जमेकावरुन अमेरिकेत आले होते. 

माझी आई श्यामला 19 वय असताना कॅलिफोर्नियात आली. त्यावेळी त्यांच्याकडे फारसं काही नव्हतं. मात्र, त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील म्हणजे माझी आजी राजन आणि माझे आजोबा पी वी गोपालन यांच्या कडून मिळालेली शिकवण त्यांच्यासोबत होती. जगामध्ये कुठे अन्याय दिसत असेल तर त्याविरोधात लढणे आपले कर्तव्य आहे, अशी शिकवण त्यांना मिळाली होती, असं हॅरिस यांनी सांगितलं. 

वैज्ञानिकांनी सांगितला कोविड-19 लक्षणांचा क्रम; मिळू शकते मोठी मदत

माझ्या आईला त्यावेळी ऑकलँडमधील परिस्थितीने निदर्शने करण्यास प्रेरित केलं. नागरी हक्कासाठी सुरु असलेल्या आंदोलनात मार्टिन लूथर किंगसारखा नेताही महात्मा गांधींच्या अहिंसक आंदोलनाने प्रेरित झाला होता. या आंदोलनावेळी माझ्या आई आणि वडिलांची भेट झाल्याचं हॅरिस यांनी सांगितलं. 

माझी आई मला आणि माझ्या बहिणीला त्यावेळच्या मद्रासमध्ये घेऊन जाईची. आम्ही कुठून आलो आहोत आणि आपले पूर्वज कोण आहेत हे कळण्यासाठी आई आम्हाला तेथे घेऊन जायची. ती आमच्यामध्ये 'चांगल्या इ़डली'चे प्रेम निर्माण करु पाहात होती. मी मद्रासमध्ये(चेन्नई) माझ्या आजोबासोबत दूरपर्यंत फिरायला जायचे. सेवानिवृत्त झालेले आजोबा मला देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात सामिल असलेल्या नायकांच्या गोष्टी सांगायची. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच मी आज येथे उभी आहे, असं हॅरिस भारतीय-अमेरिकी नागरिकांना संबोधित करताना म्हणाल्या.

(edited by-kartik pujari) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election Kamala Harris on her proud Indian heritage