अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय पंतप्रधानांचा डंका; ट्रम्प यांच्या प्रचार व्हिडिओत मोदींचा समावेश

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार अभियानाअंतर्गत व्हिडिओच्या स्वरुपात पहिली जाहीरात जाहीर केली आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचार अभियानाअंतर्गत व्हिडिओच्या स्वरुपात पहिली जाहीरात जाहीर केली आहे. यात अमेरिकेतील २० लाख भारतीय-अमेरिकी मतदारांना लुभावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक भाषणातील क्लिप दाखवण्यात आली आहे. 

US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहिणीने त्यांच्यावर केले गंभीर आरोप
 

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भारताचा दौरा केला. यावेळी मोदी आणि ट्रम्प यांनी अहमदाबाद येथील सभेत भारतीय जनतेला संबोधित केले. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इवांका, जावई जेरेड कुशनर आणि त्यांच्या सरकारमधील शीर्ष अधिकारी होते. ट्रम्प विक्ट्री फायनेंस कमेटीचे राष्ट्रीय अध्यक्ष किम्बर्ली गुईलफॉयल यांनी व्हिडिओ जाहीरात जाहीर केली आहे. अमेरिकेचे भारतासोबत खूप चांगले संबंध आहेत आणि आमच्या अभियानाला भारतीय-अमेरिकी लोकांचा खूप मोठे समर्थन आहे, असं किम्बर्ली म्हणाल्या आहेत.

प्रचार अभियानाचे नेतृत्व राष्ट्रपतींचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर करत आहेत. त्यांनीही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ट्रम्प यांची जाहीरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 107 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये 'आणखी चार वर्ष' असे शिर्षक आहे. मागील वर्षी मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये मोदी आणि ट्रम्प हात हातात घेऊन चालत होते. याची एक क्लिप व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी ५० हजारांपेक्षा अधिक भारतीय-अमेरिकी नागरिकांना संबोधित केले होते. मोदींनी आपल्या भाषणात ट्रम्प यांची तोंडभरुन प्रशंसा केली होती.

देशात पाच राज्यांत कोरोनाचा उद्रेक; दिल्लीतच सापडतातय जास्त रुग्ण, काय आहे कारण?
 

ट्रम्प विक्ट्री इंडियन अमेरिकन फाईनेंस कमेटीचे सह अध्यक्ष अल मेसन यांनी या व्हीडिओचे दिग्दर्शन केले आहे. पंतप्रधान मोदी भारतीय-अमेरिकी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत. यामुळेच त्यांच्या अमेरिकेतील सभेला तुफान गर्दी झाली होती. २०१५ मध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डन आणि २०१७ मध्ये सिलिकॉन व्हॅलीमधील त्यांचे भाषण ऐतिहासिक ठरले. मागील वर्षी त्यांच्या ह्यूस्टन येथील 'हाऊडी मोदी' सभेत विक्रमी ५० हजार लोक जमा झाले होते.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US election pm Modi included in donald Trump's campaign video