esakal | US Election - ट्रम्प यांचा अमेरिकेतील 'युपी'मध्ये विजय; बायडेन यांची एरिझोनामध्ये मुसंडी
sakal

बोलून बातमी शोधा

eus election trump biden

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यामध्ये बायडेन सध्या आघाडीवर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काट्याची टक्कर सुरू आहे. अमेरिकेत सत्ता मिळण्यासाठी किमान 270 इलेक्ट्रोरल मते मिळवणे गरजेचं आहे.

US Election - ट्रम्प यांचा अमेरिकेतील 'युपी'मध्ये विजय; बायडेन यांची एरिझोनामध्ये मुसंडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या घरच्या मैदानात बाजी मारली आहे. फ्लोरिडामध्ये त्यांनी जोरदार टक्कर देत विजय मिळवला आहे. भारतात लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील निकाल जसा महत्त्वाचा ठरतो तसाच अमेरिकेत फ्लोरिडाचा निकाल असतो. डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाला मोठा धक्का देत एरिझोनामध्ये विजय मिळवला आहे. यामुळे बायडेन यांना एरिझोनाची 11 मते मिळाली आहे. यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत ते कायम आहेत.

एरिझोनावर बऱ्याच काळापासून रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. गेल्या निवडणुकीत ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांना पराभूत केलं होतं. दुसऱ्या बाजुला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडावर पुन्हा एकदा विजयी निशाण फडकावलं आहे. संपूर्ण अमेरिकेची नजर फ्लोरिडाच्या निकालाकडे लागून राहिली होती. या विजयानंतर ट्र्म्प यांना 29 इलेक्ट्रोरल मते मिळाली आहेत. अमेरिकेतील निवडणुकीत फ्लोरिडाच्या मतांमुळे मोठा फरक पडतो. ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. यानंतर आता विस्कोन्सिन, मिशिगन आणि पेन्सल्विनियावर सर्वांची नजर आहे. या तीन राज्यातील निकाल राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

हे वाचा - US Election : गेल्या 100 वर्षांतील सर्वाधिक मतदान; ट्रम्प-बायडेन यांच्यात चुरशीची टक्कर

गेल्या 20 वर्षात फ्लोरिडाचा इतिहास असा सांगतो की, आतापर्यंत ज्या उमेदवाराने फ्लोरिडात विजय मिळवला आहे तो राष्ट्राध्यक्ष बनला आहे. एवढंच नाही तर प्रत्येकवेळी रिपब्लिकन पार्टी फ्लोरिडामध्ये जिंकल्यानंतरच सत्तेत आली आहे. याआधी 2016 मध्ये हिलरी क्लिंटन फक्त एक टक्के मतांमुळे फ्लोरिडामध्ये पराभूत झाल्या होत्या. या राज्यात मोठ्या संख्येनं लॅटिन अमेरिकी देशांमधून आलेले लोक राहतात. यंदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी चांगली कामगिरी केली आहे.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यामध्ये बायडेन सध्या आघाडीवर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काट्याची टक्कर सुरू आहे. अमेरिकेत सत्ता मिळण्यासाठी किमान 270 इलेक्ट्रोरल मते मिळवणे गरजेचं आहे. पेनसिल्वेनियाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितलं की, इथला निकाल हाती येण्यास आणखी एक दिवस लागण्याची शक्यता आहे. पेनसिल्वेनियामध्ये 20 इलेक्ट्रोरल मते आहेत. अद्याप अनेक प्रमुख राज्यांमधील निकाल घोषित व्हायचा आहे.

loading image