US Election:"बायडेन निवडून आले तर देवच आपल्याला वाचवू शकेल"

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 13 October 2020

ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक तडजोडी केल्या, असा आरोप रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

वॉशिंग्टन- ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक तडजोडी केल्या, असा आरोप रिपब्लिकनचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. कोरोनावर मात केल्यानंतर प्रथमच फ्लोरिडा येथे सोमवारी रात्री आयोजित सभेत ट्रम्प बोलत होते.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीला जेमतेम वीस ते बावीस दिवस राहिले आहेत. मध्यंतरी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोविड झाल्याने व्हर्च्युअल सभेवर भर दिला जात होता. आता कोरोनातून बरे झाल्यानंतर सोमवारी फ्लोरिडात ट्रम्प यांची सभा झाली. हजारो समर्थकांच्या उपस्थिततीत बोलताना ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुक ऐतिहासिक असल्याचे म्हटले. ही निवडणुक जिंकायलाच हवी कारण प्रतिस्पर्धी लोक हेकेखोर आहेत, असे टम्र्प म्हणाले. डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी ज्यो बायडेन यांनी समाजवादी, मार्क्सवादी आणि डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या हाती डेमोक्रॅटिक पक्ष सोपवला. त्यांच्याकडे आता शक्तीच राहिली नाही. जर बायडेन यांचा विजय झाला तर डाव्या विचाराचे लोक देश चालवतील. त्यांना अगोदरच सत्तेची लालसा आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी टीका केली. ते निवडून आले तर देवच आपल्याला वाचवू शकेल. कारण सत्ता त्यांच्याकडे गेली तर पूर्वीसारखे अमेरिकेचे वैभव राहणार नाही. आपला देश पूर्ववत होऊ शकणार नाही, असाही दावा त्यांनी केला.

चीनला मिरच्या झोंबल्या; लडखला केंद्रशासित प्रदेश मानण्यास नकार

बायडेन यांच्यावर धनाढ्य देणगीदारांच्या आणि कट्टरपंथीयांचा पगडा आहे. या मंडळींनी आपली नोकरी बाहेरच्या मंडळींना दिली आहे. आपले कारखाने बंद पाडले आणि सर्वांसाठी सीमा खुल्या केल्या. अंत नसलेल्या युद्धावर आपल्या जवानांचा बळी दिला आणि या लोकांसाठी आपले शहर लुटण्यासाठी मोकळे ठेवले. आत आपले सैनिक परत येत आहेत. बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष हे लोकांच्या नोकऱ्या संपवतील. पोलिस खात्याला गुंडाळून ठेवतील आणि सीमा खुल्या करतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. भ्रष्टाचारी मंडळी कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवण्यासाठी आसुसलेले आहेत. परंतु आम्ही त्यांच्या मार्गावर उभे आहोत. अमेरिकी कामगार, अमेरिकी कुटुंब आणि अमेरिकेचे स्पन्न साकार करण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत, असे ट्रम्प यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी यावेळी फ्लोरिडात जिंकण्याचा विश्‍वास व्यक्त केला. मात्र रिअल क्लिअर पॉलिटिक्सच्या मते, या राज्यात बायडेन ३.५ टक्के मतांनी आघाडीवर आहेत. तर ट्रम्प यांना १.२ टक्के मत आहेत.
बायडेन यांची टर उडविली

PVCआधारकार्ड टिकाऊ आणि हाताळायला सोपे; घरबसल्या मागवता येणार!

ज्यो बायडेन हे कमी लोकांच्या सभा आयोजित करत असल्याबद्धल ट्रम्प यांनी त्यांची टर उडविली. कोविडवरची लस आणण्यास बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्ष अडथळे आणत असल्याचा आरोप केला. दरम्यान, ट्रम्प यांच्या सभेसाठी हजर असलेल्या शेकडो नागरिकांनी मास्क घातला नव्हता. ही बाब धोकादायक ठरु शकते, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांची चाचणी निगेटिव्ह

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविडवर उपचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने प्रचारात उतरले आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर मी स्वत:ला अजून शक्तीशाली समजत आहे, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान व्हाइट हाऊसच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याचे सांगितले. प्रेस सेक्रेटरी कॅली मॅक्नेनी यांनी एका निवेदनात म्हटले, की अध्यक्षांनी सलग दोन दिवस कोविड चाचणी केली असून ती निगेटिव्ह आली हे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election us president donald trump criticize joe biden