esakal | US Election: ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास काय होईल?
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा दणदणीत विजय झाला आहे.

US Election: ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास काय होईल?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बायडेन आघाडीवर होते, पण पेन्सेलवेनियातील त्यांच्या आघाडीनंतर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे. असे असले तरी ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी एक ट्विट करुन निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ते सहजासहजी व्हाईट हाऊस सोडतील असं वाटत नाही. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिल्यास काय होईल?

ज्यो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यानंतरही जर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास नकार दिला तर याबाबात निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे राष्ट्राध्यक्षांकडे जातो. बायडेन सिक्रेट सर्व्हिसला बळाचा वापर करुन ट्रम्प यांना व्हाईट हाऊसच्या बाहेर काढण्याचा आदेश देऊ शकतात. याशिवाय सरकारी संपत्तीचे हस्तांतरण न केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळे ट्रम्प यांनी कितीही आरडाओरडा केला, तरी बायडेन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेताच ट्रम्प यांना व्हाईट हाऊस सोडावे लागणार आहे.

US Election: अमेरिकेच्या इतिहासाला कलाटणी देणारी निवडणूक

निवडणूक प्रचारदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सहजासहजी पायउतार होणार नसल्याचे संकेत दिले होते.  ट्रम्प यांनी बॅलेट इन म्हणजे पोस्टाद्वारे करण्यात आलेल्या मतांबाबत आक्षेप घेतला आहे. या माध्यमातून डेमोक्रॅटिक पक्षाने घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बायडेन यांच्या विजयाच्या घोषणेनंतरही ट्रम्प यांनी त्यांना शुभेच्छा देण्याची तसदी घेतलेली नाही. यावरुन ट्रम्प यांचा आडमुठेपणा स्पष्ट होते. उलट ट्रम्प यांनी दोन ट्विट केले आहे. यात त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहे. 

दरम्यान, ज्यो बायडेन यांच्या विजयानंतर त्यांना जगभरातील नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले की, जबरदस्त विजयाबद्दल ज्यो बायडेन तुमचे अभिनंदन, उपराष्ट्रपती असताना भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यामध्ये तुमचे महत्त्वाचे योगदान होते. मी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आणखी दृढ करण्यासाठी पुन्हा एकदा तुमच्यासोबत काम करण्याची आशा व्यक्त करतो, असं ते म्हणालेत.
 

loading image
go to top