US Election: उपराष्ट्रपतीपदासाठी या भारतीय वंशाच्या महिलेला मिळू शकते संधी

kamala harris
kamala harris


वॉशिंग्टन- अमेरिकेमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातर्फे जो बायडेन यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दुसऱ्यांदा निवडून येण्याची संधी आहे. मात्र, कोरोना विषाणूला हाताळण्यात आलेले अपयश आणि कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूमुळे उसळलेली आंदोलनं यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता कमी झाल्याचं दिसत आहे. अशात कृष्णवर्णीयांचा पाठिंबा जो बायडेन यांना मिळत गेला, तर त्यांच्यासाठी लढत सोपी जाणार आहे. जो बायडेन यांनी अजून डेमोक्रॅटिक पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र, बायडेन यांच्याकडून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.

जो बायडेन यांनी आपला उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार एक महिला असेल, तसेच 1 ऑगस्टला याबाबतची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं आहे. डेमोक्रॅटकडे असे डझनभर उमेदवार आहेत जे उपराष्ट्रपतीपदासाठी उत्सुक आहेत. मात्र, या सर्वांमध्ये कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. हॅरिस या पसंतीच्या उमेदवार म्हणून समोर येत आहेत.   

आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यूनंतर पोलिसांच्या क्रुरतेचा निषेध करण्यामध्ये कमला हॅरिस या सर्वात पुढे होत्या. वर्णवादावरुन सुरु झालेल्या आंदोलनात त्यांनी निदर्शकांना समर्थन दिले होते. आंदोलकांनी बायडेन यांच्याकडे गैर-गौरवर्णीय उपराष्ट्रपती निवडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हॅरिस यांची दावेदारी मजबूत मानली जात आहे. हॅरिस यांना उमेदवारी मिळाल्यास त्या अमेरिकेतील राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्या पहिल्या आफ्रिकन-अमेरिकन आणि भारतीय-अमेरिकन महिला ठरणार आहेत. हॅरिस या 55 वर्षांच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे काम करण्यासाठी आणखीन खूप वेळ आहे.

अमेरिकेचे तिकीट काढण्यासाठी वडिलांनी खर्च केली होती एका वर्षाची कमाई

हॅरिस यांची कायदा व सुव्यवस्थामध्ये काम करण्याची पार्श्वभूमी आहे. त्या कॅलिफोर्नियाच्या माजी अॅटर्नी जनरल आहेत. या पदावर काम करत असताना त्यांनी चांगलं काम करुन दाखवलं आहे. मात्र, निवडणुकीच्या पुढे जो बायडेन अन्य पर्याय पडताळू शकतात. मात्र, सध्या तरी कमला हॅरिस याच स्पष्ट उमेदवार दिसत आहेत. दरम्यान,  डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बाइडेन यांनी राष्ट्रपतीपदासाठी  झालेल्या प्राथमिक निवडणुकीत विजय मिळवला आहे.  डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार कोण असतील हे आधीच स्पष्ट झालं होतं. कारण येथे बाइडेन यांच्या विरोधकांनी निवडणुकीआधी माघार घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com