अमेरिकेचे चीनविरोधात आणखी एक पाऊल

पीटीआय
शुक्रवार, 3 जुलै 2020

भारत आणि इतर शेजारी देशांबाबत चीनने स्वीकारलेली आक्रमक भूमिका ही सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा खरा चेहरा उघड करणारी असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मत बनल्याचे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव केलेघ मॅकएननी यांनी सांगितले. 

वॉशिंग्टन - शिनजिआंग प्रांतासह चीनमधील मानवाधिकार भंगाचा आरोप झालेल्या सर्व कंपन्यांशी व्यवहार करण्याबाबत अमेरिकेने त्यांच्याकडील कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चीनविरोधात ट्रम्प प्रशासन कडक उपाय योजत असून त्याचाच भाग म्हणून या सूचना दिल्या गेल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत चीनची व्यापारकोंडी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. चीनमधील उईगर मुस्लिमांसाठी मानवाधिकार कायदा करणे आणि हुवेई, झेडटीई या चिनी कंपन्यांना सुरक्षेसाठी धोका म्हणून जाहीर करणे, असे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयासह अर्थ आणि व्यापार मंत्रालयाने चीनमधील, विशेषत: शिनजिआंग प्रांतामधील कामगारांचे शोषण आणि मानवाधिकार भंगांचा आरोप असणाऱ्या कंपन्यांशी व्यापार करण्याबाबत अमेरिकी कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकी कंपन्यांच्या प्रमुखांनी चीनमधील कंपन्यांशी व्यापार करताना त्यात असलेल्या आर्थिक आणि कायदेशीर धोक्यांची जाणीव ठेवावी, असा इशारा देण्यात आला आहे.  हाँगकाँगमध्ये चीनने नवा सुरक्षा कायदा लागू केल्याने अमेरिका नाराज आहे. 

चीन हा जगातील सर्वांत बंदिस्त देश आहे. त्यांनी हाँगकाँगमध्ये सुरक्षेच्या नावाखाली नवा राक्षसी कायदा आणला आहे. त्यामुळे जगातील सर्वांत स्थिर, समृद्ध असलेला हा देश आता चीनच्या विळख्यात सापडला आहे. येथे आता सर्वत्र संशयाचे ढग आहेत. 
- माइक पॉम्पिओ, परराष्ट्र मंत्री

चीनचा खरा चेहरा उघड : अमेरिका
भारत आणि इतर शेजारी देशांबाबत चीनने स्वीकारलेली आक्रमक भूमिका ही सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा खरा चेहरा उघड करणारी असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मत बनल्याचे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव केलेघ मॅकएननी यांनी सांगितले. भारत-चीन तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. भारताबाबत त्यांची भूमिका चिंताजनक असल्याच्या त्या म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US move against China