कोविड विरोधात अमेरिकचं काम चांगलं, भारतात प्रचंड समस्या- डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
Tuesday, 4 August 2020

मोठ्या देशांशी तुलना करता अमेरिका कोविड-19 विरोधात चांगली लढाई लढत आहे, तर भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं वक्तव्य राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

वॉशिंग्टन- मोठ्या देशांशी तुलना करता अमेरिका कोविड-19 विरोधात चांगली लढाई लढत आहे, तर भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असं वक्तव्य राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18,55,745 वर पोहोचली आहे. मंगळवारी 52,050 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 

मला वाटतंय आपण खूप चांगलं काम करत आहोत. मला वाटतं दुसऱ्या कोणत्याही देशापेक्षा आपलं काम चांगलं आहे. भारत आणि चीन या देशांकडे पाहा. चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतात प्रचंड समस्या आहेत. दुसऱ्या देशांमध्येही अडचणी आहेत. पण दुसऱ्या देशांशी तुलना करता आपण कोरोना विरोधात चांगली लढाई देत आहोत, असं ट्रम्प म्हणाले आहेत. 

ट्रम्प यांचा TikTok ला अल्टिमेटम; मालकी विका अन् मोकळे व्हा...

चीनमध्ये मंगळवारी 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सोमवारी देशात 43 कोरोनाग्रस्त सापडले होते. 29 जूलै रोजी चीनमध्ये 100 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. त्यामुळे चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

अनेक देशांना वाटलं होतं की देशातील कोरोना आता संपला आहे, पण पुन्हा विषाणूचा उद्रेक झाला आहे. आपण देशात 6 कोटी पेक्षा अधिक कोविड-19 चाचण्या घेतल्या आहेत. इतर कोणत्याही देशापेक्षा त्या अधिक आहेत. शिवाय तात्काळ अहवाल येण्यासाठीच्या चाचण्याही आपण सुरु केल्या आहेत. अवघ्या 15 ते 20 मिनिटात तुम्हाला तुमचा कोविड अहवाल मिळू शकतो.  कोणत्याही देशात इतकं चांगलं काम होत नाहीये, असं ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेत आता आपल्या कामाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. देशभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळजवळ 6 टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. दक्षिण आणि पश्चिम भाग हॉटस्पॉट ठरले होते, येथे मागील आठवड्यापासून सुधारणा दिसून येत आहे. अरिझोनामध्ये नव्या रुग्णांच्या संख्येत 37 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच फ्लोरिडामध्ये 21.2 टक्के आणि टेक्सासमध्ये 18.7 टक्क्यांनी नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 

जगाची लोकसंख्या घटणार; कधी ते पहा पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून

सर्व लोकांनी सामाजिक अंतर राखावं, हात नेहमीनेहमी धुवावे आणि जेव्हा गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क घालावे, असं आवाहन ट्रम्प यांनी यावेळी नागरिकांना केलं. कोरोनावरील लस निर्मितीच्या कामात आपण प्रगती करत आहोत. टाळेबंदी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकत नाही. टाळेबंदीचा उद्धेश वेळ मागून घेण्यासारखा आहे. या काळात रुग्णालयाची क्षमता आणि विषाणूविरोधात प्रभावी उपचार शोधण्यासाठी वेळ मिळतो, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, अमेरिकेत कोरोना महामारीने अक्षरश: थैमान घातले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 47 लाखांच्या पुढे गेली आहे, तर आतापर्यंत 1 लाख 55 हजारांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump said about india covid situation