G20 समिटमध्ये डझनभर राष्ट्रध्यक्ष करतायत चर्चा; ट्रम्प मात्र गोल्फच्या मैदानात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

काल शनिवारी ट्रम्प यांनी कोरोना महामारीवरील चर्चेपेक्षा गोल्फ खेळणे जास्त महत्त्वाचं समजलं. 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा एक बेजबाबदारीचं वर्तन केल्याचं समोर आलं आहे. G20 समिटमध्ये एका सेशन मध्ये कोरोना महामारीवर चर्चा होत होती. यामध्ये ट्रम्प फक्त 13 मिनट थांबले आणि नंतर ते काही वेळानंतर आपल्या गोल्फ क्लबमध्ये दिसून आले. एकीकडे या कोरोना जागतिक साथीमुळे संपूर्ण जग हैराण असताना त्यावरील महत्त्वपूर्ण चर्चा सोडून ट्रम्प यांचं असं खेळाच्या मैदानात दिसून येणं बेजबाबदारपणाचं वर्तन मानलं जातंय. विशेष म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक हाहाकार सध्या अमेरिकेतच दिसून येतोय. असं असूनही ट्रम्प हे काही याबाबत गंभीर दिसून येत नाहीयेत. काल शनिवारी त्यांनी महामारीवरील चर्चेपेक्षा गोल्फ खेळणे जास्त महत्त्वाचं समजलं. 

हेही वाचा - फ्रान्सचा पाकला दणका; मिराज जेट-पाणबुड्यांच्या दुरुस्तीला नकार
सीएनएनने दिलेल्या रिपोर्टनुसार, ट्रम्प व्हाईट हाऊसमधून व्हर्च्यूअल समिटमध्ये सहभागी झाले. ते फक्त 13 मिनिटेच ऍक्टीव्ह दिसून आले. त्यानंतर ते आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबतच्या कथित घोटाळ्यावर आरोपांचे ट्विट्स करताना दिसून आले. एकीकडे जगभरातील जवळपास 24 देशांतील नेते या समिटमध्ये चर्चा करत होते तर दुसरीकडे जगातील महासत्ता म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेचा प्रमुख तिथे उपस्थित नव्हता. ट्रम्प यांचा गोल्फ खेळतानाचा एक फोटोदेखील समोर आला आहे. त्यांना हा फोटो स्वत: ट्विट केलेला नसला तरीही ते दुसऱ्या मुद्यांवर सलग ट्विट्स करत होते. ट्रम्प यांनी जेंव्हा समिट मधूनच सोडली तेंव्हा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूअल मॅक्रॉन, जर्मनचे चान्सलर एंजेला मर्केल आणि साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इनसहित बाकी नेते कोरोनाच्या जागतिक प्रादुर्भावाशी लढण्याबाबत चर्चा करत होते. मात्र, ट्रम्प यांनी यात सहभाग घेतला नाही. 

हेही वाचा - ट्विटर बायडेन यांच्याकडे देणार अध्यक्षीय अकाऊंटचे अधिकार
रविवारी G20 समिटचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. यामध्ये तीन सत्र होणार आहेत. व्हाईट हाऊसद्वारे जाहिर केलेल्या वेळापत्रकानुसार ट्रम्प यांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे. मात्र काल शनिवारी ज्याप्रकारचे वर्तन ट्रम्प यांनी केलंय ते पाहता ते आज सहभागी होतील की नाही याबाबत खात्री नाहीये. 

तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. मात्र आपला पराभव ते मान्य करायला तयार नाहीयेत. त्यांनी या निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या जो बायडेन यांना जगभरात नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून ओळखले जात आहे. नवे राष्ट्राध्यक्ष येत्या जानेवारी महिन्यात पदभार हातात घेतील तोवर डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष पदाचा सांभाळ करतील. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president Donald Trump skipped G20 session on Covid19 pandemic & visited golf club