शाळा लवकरात लवकर सुरु करा,अन्यथा...; ट्रम्प यांचा राज्यांना गंभीर इशारा

कार्तिक पुजारी
Thursday, 9 July 2020

अमेरिकेमध्ये कोरोना महासाथीने अक्षरश: थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा चंग बांधल्याचं दिसत आहे

नवी दिल्ली- अमेरिकेमध्ये कोरोना महासाथीने अक्षरश: थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा चंग बांधल्याचं दिसत आहे. शाळा प्रशासनाने लवकरात लवकर शाळा सुरु कराव्यात, अन्यथा सरकार त्यांना दिला जाणारा निधी बंद करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

चीनला चांगली अद्दल घडवली; अमेरिकेकडून भारताचे तोंडभरुन कौतुक
शाळा प्रशासनाने ट्रम्प यांच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पाळणे अशक्य आणि खर्चिक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनावर दबाव सुरुच ठेवला असून लवकरात लवकर शाळा सुरु करा अन्यथा निधी बंद करणार असल्याचं म्हटलं आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक राज्यांनी टीका केली आहे. शाळा सुरु करणे अथवा न करणे याबाबत ट्रम्प आदेश देऊ शकत नाही. हा विषय पूर्णपणे राज्याच्या अखत्यारित येतो. त्यामुळे आम्हाला जेव्हा सुरक्षित वाटेल तेव्हा आम्ही शाळा सुरु करु, असा पवित्रा राज्यांनी घेतला आहे. न्यूयॉर्क शहरानेही ट्रम्प यांच्या निर्णयानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थी आठवड्यातून केवळ दोन किंवा तीन वेळा शाळेत येतील आणि बाकीच्या वेळेत ते घरुनच ऑनलाईन शिक्षण घेतील. तसेच एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे आम्हाला शक्य होणार नाही, असं महापौर बील डी ब्लासीओ म्हणाले आहेत.

पालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावरुन डेमोक्रॅटिक पक्षाला लक्ष्य केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिकला शाळा बंद ठेवायच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

कोरोनाचं संकट हे भारतासाठी एक संधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या 31 लाखांच्या पुढे गेली आहे, तर आतापर्यंत 1 लाख 34 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असताना ट्रम्प यांनी शाळा सुरु करण्यासाठी शाळा प्रशासनावर दबाव वाढला आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी शाळा सुरु करणे आवश्यक आहे. शाळेमध्ये सर्व सुरक्षा साधणे पुरवले जातील. मात्र, शाळा सुरु न केल्यास निधी बंद केला जाईल. जर्मनी, डेनमार्क आणि नॉर्वे या देशांनी शाळा सुरु केल्या आहेत. आपणही त्या सुरु करायला हव्यात, असं ट्रम्प म्हणाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump tell schools to reopen or