
इलेक्टोरल कॉलेजच्या बैठकीपूर्वी या डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो समर्थक अमेरिकेतील रस्त्यावर उतरले होते. सर्वात मोठे आंदोलन राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे झाले.
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या इलेक्टोरल कॉलेजने जो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर केली आहे. जो बायडन यांनी एकूण 306 मते मिळवत प्रचंड बहुमत मिळवले आहे. या घोषणेमुळे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाला आहे. यावर्षी प्रत्येक राज्याची मतमोजणी महत्त्वाची झाली होती. कारण ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला होता. यंदाच्या निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी त्यांच्या विजयाचा दावा केला होता. अखेर इलेक्टोरल कॉलेजने बायडन यांच्या विजयाची घोषणा केल्याने ट्रम्प काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
इलेक्टोरल कॉलेजच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील काही राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. मतपत्रिकेद्वारे मतदान झाले. यादरम्यान कोरोनाविषयक सर्व नियमावलींचे पालन करण्यात आले होते. इलेक्टोरल कॉलेजचे निकाल वॉशिंग्टनला पाठवले जातील. दि. 6 जानेवारीला काँग्रेसच्या बैठकीचे अध्यक्षपद उपराष्ट्राध्य माइक पेन्स हे भूषवतील.
हेही वाचा- सौदी अरेबिया,युएईबरोबर लष्करी सहकार्य वाढणार; लष्करप्रमुखांकडून प्रथमच दौरा
#UPDATE | Democrat Joe Biden wins state-by-state Electoral College vote that formally determines US presidency. Based on November’s results, Biden earned 306 Electoral College votes to Republican Donald Trump’s 232: Reuters https://t.co/xIqeFWVd49
— ANI (@ANI) December 14, 2020
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या दाव्यांमुळे बायडन यांच्यासमोर नवीन अडचण निर्माण झाली होती. या निवडणुकीत ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मते मिळाली. पॉप्युलर मतांमध्येही डेमोक्रेटिक पक्षाचे बायडन यांना देशभरात ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. कॅलिफोर्नियामधून बायडन यांना सर्वाधिक 55 इलेक्टरोल मते मिळाली. बायडन यांनी सायंकाळी आपल्या भाषणात अमेरिकेच्या अस्मितेच्या या युध्दात लोकशाहीचा विजय झाला असल्याचे म्हटले.
हेही वाचा- Year End 2020: गुन्हेगारी जगतातील 5 घटना ज्यांनी देशाला हादरवून सोडलं
दरम्यान, इलेक्टोरल कॉलेजच्या बैठकीपूर्वी या डोनाल्ड ट्रम्प यांचे हजारो समर्थक अमेरिकेतील रस्त्यावर उतरले होते. सर्वात मोठे आंदोलन राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे झाले. तर इतर काही शहरांतही मोठ्या संख्येने लोकांनी आंदोलनात भाग घेतला. तत्पूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात बायडन यांच्या विजयाचा निकाल बदलावा यासाठी रिपब्लिकने दाखल केलेली याचिका फेटाळली होती. ट्रम्प समर्थक आणि विरोधकांमध्ये शनिवारी सायंकाळी काही ठिकाणी बाचाबाचीही झाली. यात चाकू लागल्याने चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 23 जणांना हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या आंदोलनात बहुतांश ट्रम्प समर्थकांनी मास्क परिधान केला नव्हता.