
अमेरिकेत ओमिक्रॉन रुग्णाच्या पहिल्या मृत्यूची नोंद; भारतात 4 दिवसांत दुप्पट रुग्णसंख्या
वॉशिंग्टन : अमेरिकेत ओमिक्रॉनबाधित (Omicron in US) रुग्णाच्या मृत्यूची पहिली घटना घडली. टेक्सासमधील हा रुग्ण ५० ते ६० वर्षांचा होता. त्याचे लसीकरण झालेले नसल्याने कोरोनामुळे गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका जास्त होता, असे येथील हॅरिस काउंटी आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी (ता.२०) जाहीर केल्याचे वृत्त ‘एबीसी न्यूज’ने दिले आहे. (First Omicron Death in US)
हेही वाचा: मतदान ओळखपत्राला 'आधार' देण्याचे विधेयक राज्यसभेतही मंजूर
अमेरिकेत जनुकीय डेटानुसार १८ डिसेंबरपर्यंत कोरोनाविषाणूच्या संसर्गात ७३ टक्के प्रमाण ओमिक्रॉनचे असल्याचे ‘द यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन’ (सीडीसी) या संस्थेने काल सांगितले. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला ब्रिटनमध्ये पहिल्या ओमिक्रॉनबाधिताचा मृत्यू झाला. ओमिक्रॉनचा जगातील तो पहिला बळी होता. कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराने तेथे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून १०४ जण रुग्णालयात आहेत. ही माहिती ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमनिक राब यांनी काल दिली.
हेही वाचा: उपराजधानीत थंडीचे तीन बळी! पारा पुन्हा घसरला
भारतात काय परिस्थिती?
चार दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली असून आज ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा २०० वर (India Omicron Cases) पोहोचला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या १७ डिसेंबरला ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १०१ होती. त्यानंतर १९ डिसेंबरला त्यात भर पडून रुग्णसंख्या १२६ वर पोहोचली. सध्या देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.
Web Title: Us Reports First Omicron Death An Unvaccinated Man From Texas Report
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..