लस घ्या आणि जिंका बंदूक, गांजा आणि बिअर; अमेरिकन लोकांसाठी भन्नाट ऑफर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लस घ्या आणि जिंका बंदूक, गांजा आणि बिअर; अमेरिकन लोकांसाठी भन्नाट ऑफर्स

लस घ्या आणि जिंका बंदूक, गांजा आणि बिअर; अमेरिकन लोकांसाठी भन्नाट ऑफर्स

वॉशिंग्टन : सध्या संपूर्ण देशात कोरोनाचं संकट धूमाकूळ घालत आहे. या संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण जगात सध्या कोरोना लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण जगातील सरकारे लवकरात लवकर आपल्या देशातील लोकसंख्येचं लसीकरण करु इच्छित आहेत. अमेरिकेने आपल्या एकूण लोकसंख्येपैकी अर्ध्या लोकसंख्येला लस दिली आहे. जून महिन्यामध्ये जास्तीतजास्त लोकांना लस देण्याची अमेरिकेची योजना आहे. ही लसीकरणाची मोहिम अधिक गतीने पार पाडण्यासाठी तसेच लसीकरणासाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी अमेरिकेत सध्या अगदी मजेदार अशा ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्स ऐकून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. अनेक ठिकाणी कोरोनाची लस घेतल्यास लोकांना मोफत गन, बीअर तसेच मरिजुआना अर्थात गांजा दिला जात आहे. (US State Offers Free Marijuana Gun Bear To Encourage Covid Vaccination)

अमेरिकेतील 42 टक्के लोकांना दिली गेलीय लस

रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेमध्ये आतापर्यंत एकूण 302,851,917 लोकांना लस दिली गेली आहे. तर एकूण लोकसंख्येच्या 42 टक्के म्हणजेच 139,748,661 लोकांना लसीचे दोन्हीही डोस दिले गेले आहेत. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन चार जुलै रोजी साजरा केला जातो. राष्ट्राध्यक्षा जो बायडन यांनी चार जुलै रोजी कोरोनापासून स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. बायडन प्रशासनाने त्यावेळेपर्यंत 70 टक्के वयस्कर लोकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं आहे.

अनेक राज्ये देत आहेत हटके ऑफर्स

न्यूज स्कॉयच्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन लोक मोठ्या प्रमाणावर लसीकरणासाठी यावेत, यासाठी त्यांना वेगवेगळ्या आकर्षित करणाऱ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. लोकांनी लस घेतल्यास त्यांना बंदूक, सुट्ट्या, रोख पैसे तसेच क्रिस्पी क्रेम्स सहित अनेक आकर्षित करणाऱ्या ऑफर्स दिल्या जात आहेत. या ऑफर्समध्ये आता आणखी एक बाब जोडली गेली आहे. वॉशिंग्टनमध्ये गांजाची लायसन्सप्राप्त दुकाने लोकांना मोफत गांजा ओढण्याच्या ऑफर्स देत आहेत. राज्यातील अधिकारी यास 'जॉईंट्स फॉर जॅब्स' योजना सांगून या ऑफरचा प्रचार करत आहेत.

अनेक लोकांनी जिंकला रोख पुरस्कार

अमेरिकेमध्ये लस घेतलेल्या अनेक लोकांना रोख रक्कम आणि स्कॉलरशीप देखील दिली गेली आहे. कॅलिफोर्नियामध्ये 15 जूनच्या आधी लस दिल्या जाणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यासाठी 16.5 मिलीयन डॉलरची रक्कम ठेवली आहे. तर कोलोराडोमध्ये लस घेतलेल्या सॅली स्लीगरने एक मिलीयन डॉलरचा पुरस्कार जिंकला आहे.

वेस्ट व्हर्जीनियामध्ये हंटींग रायफल

रिपोर्टनुसार, वेस्ट व्हर्जिनियामध्ये लस घेण्यासाठी लोकांना मोफत शॉटगन तसेच हंटींग रायफल देण्याची ऑफर देखील दिली गेली आहे. या राज्यामध्ये शिकार तसेच मासे पकडणे लोकांचा आवडता छंद आहे. अमेरिकेमध्ये सध्या दररोज सहा लाखाच्या आसपास लस दिली जात आहे. अमेरिकेत सध्या लसींची बचत होत आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष बायडने यांनी कोरोनाच्या आठ कोटी लसी इतर देशांना पाठवण्याची घोषणा केली आहे.