जपानच्या सुरक्षेसाठी अमेरिका कटिबद्ध

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

पेन्स यांनी आज टोकियोत जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्याशी चर्चा केली. जपानच्या सुरक्षेसाठी अमेरिका कटिबद्ध आहे, असे पेन्स यांनी या वेळी स्पष्ट केले

टोकिओ - जपानची सुरक्षा करण्यास अमेरिका कटिबद्ध असल्याचे अमेरिकेने आज स्पष्ट केले. दर आठवड्याला क्षेपणास्त्र चाचणी घेण्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला असून, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी जपानला आश्वासन दिले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून येत असलेला दबाव झुगारून उत्तर कोरियाने आपला आण्विक कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. अमेरिकेने अनेक इशारे दिल्यानंतरही उत्तर कोरियाने रविवारी क्षेपणास्त्र चाचणी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच या क्षेपणास्त्राचा स्फोट झाला होता. सहाव्यांदा आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची उत्तर कोरिया तयारी करत असल्याची माहिती त्या देशाचे उपपरराष्ट्रमंत्री हान सॉंग यांनी दिली. तसेच, अमेरिकेने आमच्या विरोधात पाऊल उचलले तर युद्धाचा भडका उडू शकतो, अशी धमकीही हान यांनी "बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे.

त्यामुळे कोरियन द्वीप्रकल्पातील तणाव शिगेला पोहोचला असून, त्या पार्श्वभूमीवर पेन्स यांनी आज टोकियोत जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांच्याशी चर्चा केली. जपानच्या सुरक्षेसाठी अमेरिका कटिबद्ध आहे, असे पेन्स यांनी या वेळी स्पष्ट केले, तर राजनैतिक मार्गांनी या प्रश्नी तोडगा काढण्यावर अबे यांनी भर दिला, असे पेन्स म्हणाले.

Web Title: USA committed for Japan's Security