ट्रम्प यांचे जावई 'एफबीआय'च्या निशाण्यावर

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

रशियन राजदूताशी चर्चा केल्याची माहिती उजेडात
 

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई व व्हाईट हाउसचे वरिष्ठ सल्लागार जारेड कुशनेर यांच्या हालचालींवर एफबीआय या तपास संस्थेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी रशियाचा एक राजदूत व अन्य अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप या प्रकरणाचा तपास एफबीआय करत असून, वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या एका वृत्तानुसार, कुशनेर यांनी रशियन राजदूत व मॉस्कोस्थित एक बॅंकर तसेच, अन्य अधिकाऱ्यांशी गतवर्षी डिसेंबर महिन्यात चर्चा केल्याचे समोर आले असून, या प्रकरणात कुशनेर यांचीही चौकशी होणार आहे. मात्र, यासाठी त्यांना बोलावण्यात आले होते की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अध्यक्षपद निवडणुकीत रशियन हस्तक्षेपासंदर्भात कुशनेर यांच्याकडून महत्त्वपूर्ण पुरावे मिळतील, अशी आशा एबीआयच्या अधिकाऱ्यांना आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रे व रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा या दोन गोष्टी नजरेसमोर ठेवत एफबीआयची कार्यवाही सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: usa news donald trump son in law fbi target