पाकिस्तान बनवतोय कमी पल्ल्याची, धोकादायक अण्वस्त्रे: अमेरिका

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कमी पल्ल्याच्या नवीन अण्वस्त्रांसहित पाकिस्तान दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रेही तयार करत आहे. या नव्या प्रकारच्या अण्वस्त्रांमुळे या भागामधील राजकारण अधिक तणावग्रस्त आणि नवीन धोके निर्माण होतील

वॉशिंग्टन - पाकिस्तान नवी, कमी पल्ल्याची अण्वस्त्रे तयार करत असून यामुळे या तणावग्रस्त भागामधील वातावरण धोकादायक होण्याची शक्‍यता असल्याचा इशारा अमेरिकेचे गुप्तचर विभाग प्रमुख डॅन कोट्‌स यांनी दिला आहे.

जैश-इ-मोहम्मद या पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेने जम्मु येथील भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोट्‌स यांचा हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. या हल्ल्यामध्ये सहा भारतीय जवान हुतात्मा झाले होते. भारत व पाकिस्तानमधील संबंध गेल्या काही वर्षांत सातत्याने तणावग्रस्त होत असून यामुळे सीमारेषेवर सातत्याने युद्धमान स्थिती आहे. कोट्‌स यांनी अमेरिकेतील लोकप्रतिनिधींसमोर बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.

"कमी पल्ल्याच्या नवीन अण्वस्त्रांसहित पाकिस्तान दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रेही तयार करत आहे. या नव्या प्रकारच्या अण्वस्त्रांमुळे या भागामधील राजकारण अधिक तणावग्रस्त आणि नवीन धोके निर्माण होतील,'' असे कोट्‌स म्हणाले. याचबरोबर, येत्या काही वर्षांत भारताचे चीनबरोबरील संबंध अधिक तणावग्रस्त होतील, असे कोट्‌स यांनी सांगितले.

""डोकलाम येथे भारत व चीनचे लष्कर समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावावर गेल्या ऑगस्ट महिन्यात तोडगा निघाला. मात्र यानंतरही चीन व भारतामधील संबंध तणावग्रस्तच राहतील; किंबहुना अधिकच बिघडतील, असा अंदाज आहे,'' असे कोट्‌स म्हणाले.

Web Title: usa pakistan india china nuclear weapons