
या घटनेवर अनेक देशांनी आपल्या संवेदना जाहीर केल्या आहेत.
नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ग्लेशियर कोसळण्याच्या घटनेवर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, नेपाळसहित अनेक देशांनी आपल्या संवेदना दर्शवल्या आहेत. रविवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठमध्ये ग्लेशियर कोसळल्याने कमीतकमी 10 लोकांचा जीव गेला आहे तर अद्याप 150 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गंगाच्या उपनद्या धौली गंगा, ऋषी गंगा आणि अलकनंदामध्ये पूराने उच्च पर्वतीय क्षेत्रामध्ये भीतीचं वातावरण आहे तसेच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
एका बोगद्यामधून 16 कामगारांची सुटका
एनटीपीसीच्या तपोवन-विष्णुगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच या प्रकल्पातील अनेक कामगार एका बोगद्यात अडकले होते. अशा अडकलेल्या 16 कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं गेलं आहे तर जवळपास 150 हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. या घटनेवर अनेक देशांनी आपल्या संवेदना जाहीर केल्या आहेत.
Our deepest condolences to those affected by the glacier burst and landslide in India. We grieve with the family and friends of the deceased and extend our hopes for a speedy and full recovery for the injured: US State Department pic.twitter.com/A8arEpTZjt
— ANI (@ANI) February 7, 2021
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ग्लेशियर कोसळल्याने झालेल्या नुकसानाबाबत तसेच यात दुर्घटनाग्रस्त झालेल्या लोकांबाबत आमच्या संवेदना आहेत. या दुखद घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबियांसमवेत तसेच त्यांच्या मित्राच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील, अशी आशा करतो.
फ्रान्सने देखील दिली प्रतिक्रिया
फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉनने या आपत्तीबाबत पंतप्रधान मोदींना ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, फ्रान्स भारतासोबत आहे. या दुर्घटनेत 100 हून अधिक बेपत्ता झालेल्या लोकांच्या कुटुंबियांसोबत आमच्या सहवेदना आहेत.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय की, ते या दुर्भाग्यपूर्ण घटनेमुळे शोकाकूल झाले आहेत. आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की, उत्तराखंडमध्ये ग्लेशियर कोसळल्याने अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत. बेपत्ता लोक सुरक्षित असतील, अशी आशा करुयात.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलंय की, उत्तराखंडमध्ये ग्लेशियर कोसळ्याने अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यावर पाकिस्तान शोकाकूल आहे. आमच्या संवेदना पीडित कुटुंबियांच्या समवेत आहेत. या दुर्घटनेतील बेपत्ता लोकांसोबत आमच्या संवेदना आहेत. ते सुरक्षित असतील अशी प्रार्थना आम्ही करतो.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांनीदेखील उत्तराखंड आपत्तीवर आपल्या संवेदना जाहीर केल्या आहेत. त्यांनी म्हटलंय की, या कठिण काळामध्ये ऑस्ट्रेलिया आपल्या सर्वांत जवळच्या देशांमधील एक भारत या देशाच्या सोबत आहे.