कोरोना लसीकरणानंतरही रोगाच्या संक्रमणाचा आहे धोका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

कोरोनाची लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका आहे.

लंडन : इंग्लंडमधील एका प्रमुख मेडिकल ऑफिसरने एक नवा दावा केला आहे, जो आता चर्चेस कारण ठरत आहे. त्यांनी म्हटलंय की, कोरोनाची लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका आहे. कारण लस दिल्यानंतर प्रतिकार शक्ती शरिरात निर्माण व्हायला कमीतकमी तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. यासाठी लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे सक्तीने पालन करणे आवश्यक आहे. इंग्लंडचे उपमुख्य चिकित्सा अधिकारी जोनाथन वॅन-टॅम यांनी म्हटलं की आतापर्यंत या गोष्टीचा कसलाही पुरावा उपलब्ध झाला नाहीये की, लस दिल्यानंतर  त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचे संक्रमण होणारच नाही.

पुढे त्यांनी म्हटलं की, कुणाला लस मिळाली असो अगर नसो, मात्र, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन कसोशिने होणे गरजेचे आहे. कारण लस घेतल्यानंतर तिची सुरक्षा प्राप्त व्हायला तीन आठवड्यांचा कालावधी लागतो. आतापर्यंत आपल्याला याची माहिती नाहीये की, लसीकरणाचा व्हायरसच्या प्रसारावर काय फरक पडतो.  ब्रिटनमध्ये एकीकडे नव्या कोरोनाचे थैमान वाढत असतानाच त्यांचं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. गेल्या आठ  डिसेंबरपासून इंग्लंडमध्ये लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात करण्यात आली होती.

हेही वाचा - Video: पुतीन यांच्या अभेद्य किल्ल्याच्या व्हिडिओने रशियात खळबळ; 5 दिवसांत 8 कोटी व्ह्यूज

ब्रिटनमध्ये कोरोना मृतांची एकूण संख्या 97,329 वर गेली आहे. तर सध्या दररोज सुमारे 1300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. जोनाथन वॅन-टॅम यांनी म्हटलं की देशात 32 लसीकरणाची केंद्रं बनवली जातील. ब्रिटनमध्ये लस घेतलेल्या लोकांची एकूण संख्या 58 लाखांहून अधिक झाली आहे. सध्या ही मोहित गतीने सुरु आहे. 
ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी लोकांना लसीकरणानंतरही खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं आहे. लस भलेही रोगाला आळा घालत असेल मात्र ती रोगाच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कितपत प्रभावी आहे, हे आपल्याला अद्याप माहिती नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे कटाक्षाने पालन सर्वांनीच करणे आवश्यक आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaccinated People May Still Transmit Covid Englands Chief Medic