Video: पुतीन यांच्या अभेद्य किल्ल्याच्या व्हिडिओने रशियात खळबळ; 5 दिवसांत 8 कोटी व्ह्यूज

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 24 January 2021

रशियात काळ्या समुद्राजवळ एक अभेद्य किल्ला आहे

मॉस्को- रशियात काळ्या समुद्राजवळ एक अभेद्य किल्ला आहे. यात सर्व अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आहे. परवानगीशिवाय याठिकाणी पक्षीही प्रवेश करु शकत नाही. सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्या या किल्ल्याची किंबहुना शहराची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. याठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे, व्लादिमीर पुतिन. रशियाचा हुकूमशहा...

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत हा खुलासा केला आहे त्यांचे विरोधक आणि टीकाकार अलेक्सी नवल्नी यांनी. नवल्नी यांच्या अँटी करप्शन फाऊंडेशनने यूट्यूबवर दोन तासांचा एक व्हिडिओ टाकला आहे. यामध्ये सांगण्यात आलंय की पुतिन यांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार करुन आपल्यासाठी ऐषो-आरामाच्या सुविधा जमा केल्या आहेत. फाऊंडेशनच्या माहितीनुसार, त्यांना याची माहिती कॉन्ट्रॅक्टर्स आणि प्रोजेक्ट ब्लूप्रिंट्समधून मिळाली आहे.  

राज्यात शेतकऱ्यांचा मोर्चा तर रशियात नवाल्नी समर्थक भडकले; देश विदेशातील...

पेशाने वकील असणारे नवल्नी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे कट्टर विरोधत आहेत. त्यांनी 2011 मध्ये अँटी करप्शन फाऊंडेशन नावाचे संघटना बनवली होती. रशियाच्या सर्वोच्चपदी बसलेल्या पुतिन यांचे काळे कारनामे लोकांसमोर आणण्याचा त्यांचा उद्देश होता. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्यामुळेच ते पुतिन यांच्या डोळ्यात खटकू लागले होते. त्यांना दोन वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला आहे. 2020 मध्ये त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. सुदैवाने ते वाचले आहेत, पण त्यांना रशियामध्ये अटक करण्यात आली आहे. 

अँटी करप्शन फाऊंडेशनने यूट्यूवर टाकलेल्या व्हिडिओत नवल्नी पुतिन यांच्या भ्रष्टाचाराची चिरफाड करत आहेत. दोन तासाचा हा व्हिडिओ अवघ्या 5 दिवसात 8 कोटी लोकांनी पाहिला आहे. नवल्गी यांनी पुतिन यांनी बांधेलेल्या अवैध किल्ल्याची माहिती दिली आहे. पुतिन यांचा किल्ला 179 एकरवर पसरलेला असून याची किंमत तब्बल 1.4 अब्ज डॉलर इतकी आहे. या किल्ल्याच्या आवारात इतर कसलीही वस्ती नाही. या किल्ल्यात 2 हेलिपॅड आहेत, तसेच अंडरग्राऊंड बांधकाम आहे. 

नवल्नी यांनी सांगितल्यानुसार, पुतिन यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत हे साम्राज्य उभं केलं आहे. याठिकाणी हजारो लोक काम करतात. त्यांना आतमध्ये मोबाईल फोनही घेऊन जाण्याची परवानगी नाही. ठिकठिकाणी रशियन सैनिक तैनात आहेत. किल्ल्यात जीम, स्विमिंग फूल, कसिनो आणि चर्च आहे. देशात 2 कोटी लोक गरीब आहेत. त्यांना मदत करण्याऐवजी पुतिन पैसे उडवत आहेत. दरम्यान नवाल्गी 15 फेब्रुवारीपर्यंत मॉस्को पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण, त्यांच्या समर्थकांनी रशियात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्यात आणि रशियन पोलिसांमध्ये हिंसक झडप होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vladimir Putin secret 1 billion palace on Russia Black Sea Alexei Navalny