व्हेनेझुएलात नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

देशातील काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सीमाभागात कार्यरत असणाऱ्या माफियांना इतरत्र नोटा पाठविण्याची संधी मिळणार नाही. मात्र, अध्यक्ष मादुरो यांच्या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र जोरदार टीका केली होती.

करॅकस - बँकांमध्ये झालेली गर्दी, नोटांची कमतरता आणि देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी शनिवारी नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. आता जानेवारीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

व्हेनेझुएला सरकारने 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्वाधिक मूल्याची शंभर बोलिव्हरची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकांबाहेर नागरिकांची गर्दी झाली असून, नोटांची कमतरता आहे. एका व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने 100 बोलिव्हरची नोट रद्द करून 500, 2000 आणि 20000 बोलिव्हरची नवी नोट बाजारात आणली होती. तसेच नोटा बदलून घेण्यासाठी फक्त 72 तासांचा वेळ देण्यात आला होता. नोटाबंदीचा निर्णय चुकीचा ठरविण्यासाठी परदेशी शक्ती कार्यरत असल्याचा आरोप अध्यक्ष मादुरो यांनी केला आहे. 

देशातील काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे सीमाभागात कार्यरत असणाऱ्या माफियांना इतरत्र नोटा पाठविण्याची संधी मिळणार नाही. मात्र, अध्यक्ष मादुरो यांच्या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र जोरदार टीका केली होती. देशातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय अविचारीपणाचा असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. व्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून, सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे.

Web Title: Venezuela postpones bank note ban after chaos and cash shortages