या देशात 10 हजार लोकांमागे 8 डॉक्टर; तरीही कोरोनाचा एकही बळी नाही!

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 मे 2020

चीन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) हा विषाणू एका व्यक्तीपासून दूसऱ्या व्यक्तीकडे पसरतो असं सुचित करण्यापूर्वीच व्हिएतनाममध्ये उपाय योजना सुरु करण्यात आल्या होत्या. खबरदारी म्हणून व्हिएतनामने सुरु केलेली तयार आज जगासाठी एक मोठा धडा ठरत आहे.

हनोई : कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. जगभरात आतापर्यंत 55 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 3.56 लाख लोकांचा यामुळे बळी गेला आहे. अमेरिकेसारखा विकसित देश कोरोनासमोर हतबल झाला आहे. मात्र, चीनशी खेटून असलेल्या व्हिएतनाम देशामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत एकही बळी गेलेला नाही. व्हिएतनाम देशाची लोकसंख्या जवळजवळ दहा कोटी आहे.  व्हिएतनामची सीमा चीन लगत असताना या देशात आतापर्यंत फक्त 328 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे देशात कोरोना विषाणूमुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही.  

या राज्याने घातली तब्बल पाच राज्यातील लोकांना बंदी

व्हिएतनाम हा कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये मोडतो. देशाची आरोग्य व्यवस्थाही अमेरिका, दक्षिण कोरियासारख्या देशांसारखी नाही. व्हिएतनाममध्ये 10 हजार लोकांमागे केवळ 8 डॉक्टर आहेत. मात्र, देशाने वेळीच जागरुकता दाखवत देशात तीन आठवड्य़ांची कडकडीत टाळेबंदी लागू केली.  त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन टाळेबंदी उठवण्यात आली. आता व्हिएतनामध्ये 40 दिवसांपासून कोरोनाच्या स्थानिक संक्रमणाची एकही घटना नाही. त्यामुळे आता सर्व जनजीवन सुरळीत केले जात आहे. तसेच शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.  व्हिएतनामने असं काय केलं ज्याने कोरोना आटोक्यात आला यासंदर्भात जगभरात या देशाची चर्चा सुरु आहे. 

चीनसोबत लागून असलेली सीमा बंद

कोरोना विषाणूचा  पहिला रुग्ण वुहान शहरात सापडताच चीनसोबत लागून असलेल्या सर्व सीमा बंद करण्याचा निर्णय व्हिएतनाम या छोट्याशा राष्ट्राने घेतला. चीन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) हा विषाणू एका व्यक्तीपासून दूसऱ्या व्यक्तीकडे पसरतो असं सुचित करण्यापूर्वीच व्हिएतनाममध्ये उपाय योजना सुरु करण्यात आल्या होत्या. खबरदारी म्हणून व्हिएतनामने सुरु केलेली तयार आज जगासाठी एक मोठा धडा ठरत आहे.   
जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश मिळण्याआधीच देशाचे तयारी सुरु केली. त्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जानेवारीच्या सुरुवातीलाच हनोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वुहान शहरातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आली. ज्यांच्यामध्ये थोडीदेखील तापमान वाढ दिसून आली त्यांचे 14 दिवसांसाठी विलगीकरण करण्यात आले.

'लॉकडाउन-5' चा निर्णय कोणाच्या कोर्टात?

जानेवारी महिन्यात चीनसोबतचा संपर्क तोडला

व्हिएतनाममध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 23 जानेवारीला आढळून आला. त्यानंतर चीनमधून येणाऱ्या सर्व विमानांवर बंदी आणण्यात आली. देशाच्या सर्व सीमा चेक पोस्ट, विमानतळ आणि बंदरांवर थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आली. तसेच व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी संसर्ग नियंत्रणासाठी राष्ट्रीय संचालन समितीची नेमणूक केली.

मार्च महिन्यात विदेशी लोकांना परवानगी नाकारली

देशात 1 फेब्रुवारीला कोरोना विषाणुला राष्ट्रीय महामारी घोषीत करण्यात आले. यावेळीपर्यंत देशामध्ये फक्त 6 कोरोनाबाधित सापडले होते. चीनी नागरिकांचा व्हिजा निलंबित करण्यात आला. तसेच मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्व विदेशी लोकांना प्रवेश नाकारण्यात आला.

चाचण्यांचं प्रमाण वाढवलं

गरीब देश असून सुद्धा व्हिएतनामने कोरोना विषाणुची चाचणी करणारे स्वस्तातले चाचणी किट विकसित केले. जे लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले त्यांची चाचणी करण्यात आली. तसेच अनेकांना बळजबरीने 14 दिवसांसाठी विलगीकरणात टाकण्यात आले.

कोरोना विषाणूबाबत सामाजिक जागरुकता

व्हिएतनामने कोरोना विषाणू संसर्गाच्या पहिल्या टप्प्यातच त्याच्यावर नियंत्रण मिळवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. सोशम मिडिया, पोस्टर्सच्या माध्यमातून covid-19 ची माहिती देण्यात आली. त्याचा चांगला फायदा दिसून आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vietnam does not have single coronavirus death reported