esakal | मेंढपाळाच्या पोराची 'गगन' भरारी; अवकाशात लावला लघुग्रहाचा शोध I NASA
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Doltade

या टीमनं प्राथमिक अवस्थेत शोधलेल्या ह्या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असं नाव देण्यात आलंय.

मेंढपाळाच्या पोराची 'गगन' भरारी; अवकाशात लावला लघुग्रहाचा शोध

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : अमेरिकन अवकाश संशोधन संस्था, नासाने (NASA) सुरु केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत (International Asteroid Expedition) सातारा जिल्ह्यातील माळवाडी गावच्या (ता. माण) विनायक दोलताडे (Vinayak Doltade) यांनी अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळविलंय.

नासा, पॅन स्टार्स, कॅटालिना स्काय सर्वे व हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी, टेक्सास (Hardin-Simmons University) यांच्याकडून 1 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरच्या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेत 'खगोल-भूगोल वेद आणि विज्ञान' या त्यांच्या टीमकडून एका नवीन लघुग्रहाचा शोध नोंदवण्यात आला. या टीममध्ये विनायक दोलताडे यांच्यासह आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनीष जाधव, गौरव डाहुले यांचा समावेश आहे. या टीमनं प्राथमिक अवस्थेत शोधलेल्या ह्या ग्रहाला (P11K6CL) सध्या KBV0001 असं नाव देण्यात आलं असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आलीय. तीन ते पाच वर्षे त्याच्या स्थितीचे व हालचालींचे निरीक्षण घेऊन त्याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा: राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल

या टीमचा प्रमुख विनायक हा एका मेंढपाळाचा मुलगा असून त्याचे प्राथमिक शिक्षण रांजणी (ता. माण, जि. सातारा) येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज म्हसवडची भागशाळा, माळवाडी येथे झाले आहे. यातील विनायक, गौरव आणि वैभव यांचे उच्च-शिक्षण पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातून झाले आहे. तसेच मनीष, आनंद आणि संकेत हे मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर, पुणे येथून भूगोल विषयात पदवीधर झाले आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या विनायकने मिळवलेल्या या यशाबद्दल त्याचे व त्याच्या टीमचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

loading image
go to top