POK मधील गिलगिट-बाल्टिस्तानात हिंसक आंदोलन; निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

भारताने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूका घेण्याच्या निर्णयावर आपला आक्षेप जाहीर केला होता.

इस्लामाबाद : पाकिव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या इमरान खान सरकारविरोधात हिंसक आंदोलन झाले आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, इमरान खान सरकारने अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोटाळा केला आहे. आंदोलनकर्त्यांनी आपला राग आणि निराशा दाखवण्यासाठी टायर जाळले आहेत तसेच रस्ते जाम केले होते. अलिकडेच झालेल्या निवडणुकीत इमरान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला गिलगिट-बाल्टिस्तानमधील अधिकतर जागांवर विजय प्राप्त झाला आहे. तसेच ते तिथे सरकार बनवण्यात यशस्वी ठरले आहेत. 

हेही वाचा - 26/11: कसाबसह खात्मा झालेल्या 10 दहशतवाद्यांसाठी हाफिज सईदची 'नापाक' सभा
तर विरोधकांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आणि सरकारने सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला आहे. भारताने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूका घेण्याच्या निर्णयावर आपला आक्षेप जाहीर केला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपलं वक्तव्य प्रसिद्ध करत गिलगिट-बाल्टिस्तानला आपल्या भाग असल्याचा दावा करत इमरान खान सरकारद्वारे या भागात घेतल्या जात असलेल्या निवडणुकांना अवैध ठरवलं होतं. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांद्वारा केल्या गेलेल्या या आंदोलनानंतर शेकडो लोकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की, न्याय मिळाल्याशिवाय ते मागे हटणार नाहीत. भारताच्या भागात अवैधरित्या ताबा घेतलेल्या पाकिस्तानला या भागामध्ये होणाऱ्या निवडणुका नेहमीच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. 

हेही वाचा - 26/11 हल्ल्यातील पीडितांच्या आठवणीत इस्त्रायलमध्ये उभं राहणार स्मारक

पाकिस्तानचा खास मित्र चीन या भागात संपूर्णरित्या राजकीय नियंत्रण मिळवू इच्छित आहे. यामुळेच चीनच्या दबावाने इमरान खान सरकराने गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांतीय राज्याचा दर्जा दिला आहे तसेच इथे निवडणुकाही घेतल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग - नवाज दोघांनीही गिलगिट-बाल्टिस्तानच्या निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या भागामध्ये अद्याप विजयाची घोषणा बाकी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: violent protest in gilgit baltistan against rigged elections by imran khan govt